मुंबई : मॉडेलवरील बलात्कारप्रकरणी सात महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आलेला चित्रपट निर्माता डॉ. स्वराज सिंग याला शुक्रवारी सांताक्रुझ पोलिसांनी अटक केली. मात्र, छातीत दुखू लागल्याने त्याला भाभा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.चित्रपटात काम मिळवून देण्यासाठी प्रोफाइल तयार करण्याच्या बहाण्याने आरोपीने आपल्याला त्याच्या घरी बोलावून बलात्कार केल्याची तक्रार एका मॉडेलने केल्याने, सात महिन्यांपूर्वी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी आरोपीला अटक करण्यात आली. वांद्रे येथील महानगर दंडाधिकारी विश्वास माने यांच्या न्यायालयात आरोपीच्या वतीने अॅड. महेश वासवानी आणि संजय भोजने यांनी युक्तिवाद केला. आरोपीला पोलिसांनी दहा वेळा समन्स बजावून चौकशीला बोलावले होते, तसेच त्याची वैद्यकीय तपासणीही करण्यात आल्याने आरोपीला न्यायालयीन कोठडी देण्यात यावी, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली. तक्रारदार मॉडेलने आरोपीकडे पन्नास लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याबाबतची कागदपत्रे, तसेच फोन रेकॉर्डिंगचे पुरावे त्यांनी न्यायालयाला सादर केले.अटकेनंतर आरोपीच्या छातीत दुखू लागल्याने, तसेच डोके दुखू लागल्याने त्याला वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल केल्याचे अॅड. महेश वासवानी यांनी सांगितले.तक्रारदार मॉडेलनेही आरोपीकडे पन्नास लाख रुपयांची मागणी केली होती़ पैसे न दिल्याने तिने तक्रार केली़मॉडेलने केलेल्या पैशांच्या मागणीची कागदपत्रे व फोन रेकॉर्डिंगचे पुरावेही अॅड़ महेश वासवानी यांनी न्यायालयात सादर केले़
बलात्कारप्रकरणी चित्रपट निर्मात्याला अटक, मॉडेलवरही आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 1:15 AM