मुंबई : चित्रपट समाजमनाचा आरसा असून, सामाजिक जीवनाच्या स्थित्यंराचे ते वेध घेत समाजात होत असलेले बदल टिपण्याचे सामर्थ्य चित्रपटांमध्ये असते. चित्रपटांच्या माध्यमातून राष्ट्रपुरुषांच्या विचारांचे आदानप्रदान होणे हे नव्या पिढीसाठी गरजेचे आहे, असे प्रतिपादन महापौर स्नेहल आंबेकर यांनी बुधवारी मुंबई विद्यापीठात केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५व्या जयंतीनिमित्त मुंबई विद्यापीठाच्या संज्ञापन व पत्रकारिता विभागातर्फे २४ तास ‘फिल्म मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले होते, यावेळी महापौर बोलत होत्या. एकापाठोपाठ एक असे आठ विविध विषयांवरील चित्रपट यावेळी कार्यक्रमांतर्गत दाखवण्यात आले. याविषयी महापौर म्हणाल्या की, राष्ट्रपुरुषांचे विचार खोलवर रुजवणारे चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी महापालिकेकडून मदत करण्यात येईल, असे आश्वासन दिले. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, पत्रकारिता जनसंज्ञापन विभागाचे प्रमुख डॉ. सुंदर राजदीप उपस्थित होते. मॅरेथॉनमध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्यावर आधारित ‘लिंकन’, श्याम बेनेगल यांचा ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’, वेद राही दिग्दर्शित ‘वीर सावरकर’, जेम्स मार्श यांचा ‘द शेअरी आॅफ एव्हरीथिंग’, ओमकार राऊत यांचा ‘लोकमान्य’, रिचर्ड अॅटनबर्ग यांचा ‘गांधी’, केतन मेहता यांचा ‘सरदार’, वाल्टर सेल्स यांचा ‘मोटारसायकल डायरीज’ आणि दिग्दर्शन जब्बार पटेल यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर - द अनटोल्ड ट्रूथ’ हे चित्रपट दाखवण्यात आले. (प्रतिनिधी)
चित्रपट सामाजिक स्थित्यंतराचे वेध घेतात - महापौर
By admin | Published: April 16, 2016 1:42 AM