‘फिल्मस्टाइल’अपहरण; गुन्हेगार २४ तासांत जेरबंद! दलालांनीच केले होते वित्तसंस्थेच्या व्यवस्थापकाचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 02:57 AM2018-03-01T02:57:23+5:302018-03-01T02:57:23+5:30
‘१० कोटी खात्यात जमा करा, नाहीतर जिवे मारू,’ अशी धमकी दिली गेली. या कॉलने खळबळ उडाली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
मनीषा म्हात्रे
मुंबई : दिवसाढवळ्या वित्त संस्थेच्या कार्यालयाबाहेरून व्यवस्थापकाचे अपहरण झाले. ‘१० कोटी खात्यात जमा करा, नाहीतर जिवे मारू,’ अशी धमकी दिली गेली. या कॉलने खळबळ उडाली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. व्यवस्थापकाच्या मोबाइल लोकेशनवरून शोध सुरू केला. मात्र, अपहरणकर्त्यांनी त्याचा फोन बंद केल्यामुळे लोकेशन मिळणे अशक्य झाले. अपहरण करण्यासाठी वापरलेली गाडी मध्येच सोडून, प्रत्येक नव्या वळणावर ते गाडीही बदलत असल्यामुळे, त्याच्यापर्यंत पोहोचणे पोलिसांसमोर आव्हान बनले. घड्याळाचा काटा जसजसा पुढे सरकत होता, तसतसे एन. एम. जोशी पोलीस, नातेवाईक, अन्य कर्मचा-यांची चिंता वाढत होती. अखेर पोलिसांनी शिताफीने रात्रीच्या सुमारास अपहरणकर्त्यांना मुरबाडमधून अटक केली.
व्यवस्थापकाची सुटका केली आणि सुमारे २४ तास रंगलेल्या फिरत्या गाड्यांमधील या ‘फिल्मस्टाइल’ अपहरणाच्या थराराला पूर्णविराम दिला. धक्कादायक म्हणजे, वित्तसंस्थेत पैसे बुडालेल्या ४ दलालांनीच या व्यवस्थापकाचे अपहरण केल्याची माहिती तपासात समोर आली.
या गुन्ह्यांचा उलगडा केल्यामुळे एन. एम. जोशी मार्ग पोलिसांचे कौतुक करण्यात आले. याच प्रकारे, सायबर गुन्हे, विविध फसवणुकीच्या गुन्ह्यांचाही एन. एम. जोशी मार्ग पोलीस उकल करताना दिसतात. कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याचे आव्हानही त्यांच्यासमोर असते. त्यांच्या हद्दीत प्रसारमाध्यमांचे कार्यालय, कॉर्पोरेट सेक्टर मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. त्यात आर्थर रोड कारागृह त्यांच्याच हद्दीत आहे. अनेक बड्या राजकीय नेत्यांसह, गँगस्टर यात कैद आहेत. त्यामुळे तेथील हालचालींवर सतत लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. अनेक मिल या परिसरात आहेत. नुकतेच कमला मिल येथील अग्नितांडवाने सर्वांचीच झोप उडविली. या प्रकरणी दाखल गुन्ह्यांतही कुठल्याही दबावाला न जुमानता, यातील सर्व आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. या प्रकरणी त्यांचा अधिक तपास सुरू आहे.
-एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अहमद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली, कर्मचाºयांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ८ तास सेवेच्या नियोजनाबरोबरच परिसरात नागरिकांच्या तक्रारी लवकरात लवकर मार्गी लावण्याकडे पठाण यांचा कल असतो,
-तसेच शाळांमध्ये ‘पोलीस दीदी’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षणाचे धडे देणे, ज्येष्ठ नागरिकांची वेळोवेळी भेट घेत विचारपूस करणे, तसेच सोसायट्यांमधील समस्या जाणून घेण्यासाठी येथील पोलिसांची धडपड सुरू असते, तसेच वेळोवेळी सार्वजनिक सभांद्वारे जनजागृतीही करण्यात येते.
परिमंडळ ३
पोलीस उपायुक्त
- वीरेंद्र मिश्रा
लोकसंख्या - २ लाख
मनुष्यबळ - १४०
येथे करा संपर्क
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
अहमद पठाण
- ९८२१६३३४०५
पोलीस ठाणे : ०२२ -
२३०८५७३२, २३०७२५८७
प्रमुख ठिकाणे : आर्थर रोड कारागृह, विविध प्रसार माध्यमांचे कार्यालय, कमला मिल, रघुवंशी मिल, गणपतराव कदम मार्ग, परेल एस. टी. डेपो, कस्तुरबा हॉस्पिटल, सेंंचुरी मिल, बीडीडी चाळ, सन मिल इस्टेट, सीताराम मिल, शक्ती मिल, फिनिक्स मॉल, टाटा पॉवर हाउस.
आकडेवारी : २०१६ मध्ये ४१४ तर २०१७ मध्ये २९२ गुन्ह्यांची नोंद पोलीस दप्तरी झाली आहे.