मुंबई - राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालात राज्याची अर्थव्यवस्था देशाच्या 6.8 टक्के विकास दरापेक्षा अधिक वेगाने म्हणजे 7.5 टक्के दराने विकसित होत असून राज्याने मागील चार वर्षात सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊनही प्रगतीची घोडदौड निरंतर राखण्यात यश मिळवले असल्याचे वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. त्यामुळे, मुनगंटीवार आज दुपारी 1.45 वाजता राज्य सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील.
राज्याचा अर्थसंकल्प आज दुपारी सादर होणार असून आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर लोकप्रिय घोषणांची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शेतकरी वर्गाला अधिक प्रमाणात खुश करण्याचा फडणवीस सरकारचा प्रयत्न राहिल. पावसाळी अधिवेशनाला 17 जुन पासून सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी केवळ शोकप्रस्ताव ठेऊन आणि मंत्रीमंडळा विस्तारानंतर नवीन मंत्र्यांचे स्वागत करुन सभागृहाचे कामकाज बंद करण्यात आले. त्यानंतर, आज निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 2019-2020 चा आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार दुपारी अर्थसंकल्प सादर करतील. तर विधानपरिषदेत राज्यमंत्री दिपक केसरकर अर्थसंकल्प मांडणार आहेत.
आर्थिक पाहणी अहवालात राज्याचा विकासदर वाढला असला तरी राज्यातील बालकांवरील अत्याचाराबाबतच्या घटनांमध्येही गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढ झाल्याचे समोर आली आहे. बालकांच्या हत्या, बालकांवरील बलात्कार आणि अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली, असे ही पाहणी सांगते.