कलागुणांचा अंतिम निर्णय आता शालेय शिक्षण विभागाच्या कोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:06 AM2021-03-28T04:06:23+5:302021-03-28T04:06:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई शासकीय रेखाकला कला परीक्षा रद्द करून उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दहावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देऊ ...

The final decision on the merits is now in the court of the school education department | कलागुणांचा अंतिम निर्णय आता शालेय शिक्षण विभागाच्या कोर्टात

कलागुणांचा अंतिम निर्णय आता शालेय शिक्षण विभागाच्या कोर्टात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई

शासकीय रेखाकला कला परीक्षा रद्द करून उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दहावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देऊ नयेत, असा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांनी आधीच या परीक्षा दिल्या आहेत, जे या गुणांसाठी प्रस्ताव सादर करून पात्र ठरले आहेत त्या विद्यार्थ्यांवर अन्याय का, असा प्रश्न मुख्याध्यापक आणि शिक्षक शिक्षणतज्ज्ञ विचारत आहेत. याआधी बोर्डाकडून २ ते ३ वेळा मुदतवाढ देऊन सवलतीच्या गुणांचे प्रस्ताव शाळांकडून मागविण्यात आले आहेत. मग आता अचानक या सवलतीच्या गुणांवर गदा आणून शिक्षण विभाग विद्यार्थ्यांवर संभ्रम का निर्माण करत आहे, असा प्रश्न तज्ज्ञ विचारत आहेत. आधीच कोरोना काळात शिक्षण पद्धतीवर संकट ओढवलेले असताना हा बोर्डाच्या परीक्षेतील गुणांचा खेळखंडोबा कशासाठी, असा प्रश्न मुख्याध्यापक संघटनेकडून विचारण्यात आला आहे.

शालेय शिक्षण विभागाने सवलतीचे गुण देण्याचा शासन निर्णय दिलेला आहे. त्यानुसार राज्य शिक्षण मंडळाने प्रस्ताव दाखल करून घेतले आहेत. आता तंत्रशिक्षण विभाग मात्र अतिरिक्त गुण देऊ नयेत असे सांगत आहे.

राज्य शिक्षण मंडळ हे शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारित येते की तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारित, असा प्रश्न निर्माण झाला असल्याची प्रतिक्रिया मुख्याध्यापक संघटनेचे मुंबई सचिव प्रशांत रेडीज यांनी दिली. शिक्षण विभाग व राज्य शिक्षण मंडळाचा एकूण कारभार निराशाजनक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

फेरपरीक्षा घेणे, दहावी-बारावीच्या ऑफलाईन बोर्ड परीक्षा घेणे यांचे नियोजन होऊ शकते, तर कला परीक्षांचे नियोजनही नक्कीच होऊ शकते. मात्र, परीक्षा न होणे हा सरकारचा नाकर्तेपणा आहे. याची शिक्षा ज्या विद्यार्थ्यांनी आधीच प्रस्ताव सादर केले आहेत त्यांना त्यांनी का द्यावी ? असा प्रश्न आदर्श विद्यालय चेंबूरचे शिक्षक जालिंदर सरोदे यांनी केला. शिक्षक तयार आहेत, विद्यार्थी तयार आहेत. मटार परीक्षा घ्यायला व गुण द्यायला शिक्षण विभाग तयार नसेल, तर विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. कोविडसारख्या काळात आधीच मानसिक तणावाखाली परीक्षेसाठी तयार होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय चूकच असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

दहावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे १० गुण देऊ नये असे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने आपल्या निर्णयात नमूद केले आहे. याकडे लक्ष वेधून शालेय शिक्षण विभागाकडे आम्ही मार्गदर्शन घेणार आणि मगच सवलतीच्या गुणाबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली. ऐन परीक्षेवेळी त्यातच कोरोनासारख्या काळात शिक्षक, मुख्याध्यापकांना धावपळ करावी लागू नये याकरिता शाळांकडून प्रस्ताव मागविण्याची प्रक्रिया करून घेण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाचे मार्गदर्शन घेऊन यावर योग्य तो अंतिम विद्यार्थीहिताचा निर्णय होईल, असेही माहिती त्यांनी दिली.

चौकट

मुंबई विभागातून कला गुणांसाठी विभागीय शिक्षण मंडळाकडे तब्बल ३५ हजार अर्ज आल्याची माहिती मिळाली आहे. याचप्रमाणे अजूनही अनेक प्रस्तावाची प्रक्रिया सुरू असून मुख्याध्यापक संघटना त्यासाठी मुदत वाढवून घेणार होती. मात्र, त्याआधीच उच्च व तंत्रशिक्षण विभागाने परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला असल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

Web Title: The final decision on the merits is now in the court of the school education department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.