मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांनी अंतिम वर्षाच्या परीक्षांचे नियोजन १ ते १७ आॅक्टोबर दरम्यान करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, परीक्षा पद्धती, नियोजन आणि नियमावली संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक बुधवारी सकाळीच विद्यापीठ प्रशासनाने संलग्नित महाविद्यालयांसाठी जाहीर केले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीने होणार असल्याने विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनाची संधी मिळणार नाही, असे विद्यापीठाने स्पष्ट केले.
मुंबई विद्यापीठाने या परीक्षांसाठी प्रत्येक अभ्यासक्रमासाठी खास असे एक महाविद्यालयांचे क्लस्टर तयार केले आहे. प्रत्येक क्लस्टरमध्ये एक महाविद्यालय लीड करेल. हे लीड महाविद्यालय त्या क्लस्टरमधील महाविद्यालयांच्या परीक्षेची निश्चित केलेल्या नियोजनाप्रमाणे परीक्षा घेण्याची जबाबदारी पार पाडेल.
विद्यार्थ्यांकडून माहिती घेणार
सर्वांत आधी परीक्षेसाठी विद्यार्थी सज्ज आहेत की नाही याबाबत महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून माहिती मागून घ्यायची आहे. यात विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअॅप नंबर, ईमेलआयडी, पीआरएन क्रमांक, आॅनलाइन परीक्षेसाठी लागणारी सामग्री जसे की लॅपटॉप, इंटरनेट, मोबाइल त्यांच्याकडे आहे का, ही सामग्री स्वत:कडे नसेल तर कुठून उपलब्ध होऊ शकते का? सध्यस्थितीत विद्यार्थी कुठे आहे? या सर्वांचा तपशील विद्यार्थ्यांकडून गुगल फॉर्म किंवा अन्य माध्यमातून भरून घ्यायचा आहे. एखाद्या विद्यार्थ्याकडे आॅनलाइन परीक्षेसाठीची सुविधा उपलब्ध नसल्यास ती उपलब्ध करून देण्याची सूचनाही महाविद्यालयांना करण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांसाठी प्रश्नसंच
थेअरी परीक्षा बहुपर्यायी असल्याने विद्यापीठ अधिष्ठाता, महाविद्यालय प्राचार्य यांनी प्रश्नपेढी तयार करून या परीक्षांसाठी प्रश्नसंच तयार करण्याचे निर्देश विद्यापीठाने महाविद्यालयांना दिले. महाविद्यालयांनी सराव प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना सोडविण्यास द्याव्यात, असेही परिपत्रकात नमूद आहे. एखादा विद्यार्थी काही कारणास्तव परीक्षा देऊ न शकल्यास त्याला पुन्हा एक संधी मिळेल. सविस्तर परीक्षेबाबत क्लस्टर महाविद्यालयातील लीड महाविद्यालय सर्वांशी चर्चा करून लवकरच वेळापत्रक जाहीर करेल, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले.
कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊनच नियोजन
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांमधील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन परीक्षांचे नियोजन करण्यात येईल. यासाठी एखाद्या विद्यार्थ्याकडे आवश्यक तांत्रिक सुविधा नसतील तर त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्यांनी व स्वयंसेवी संस्थांनी त्याला मदत करावी. परीक्षांच्या कालावधीत त्या-त्या क्षेत्रात चांगली इंटरनेट व्यवस्था देण्यासंदर्भात इंटरनेट प्रोव्हायडर्सना व अखंडित वीजपुरवठा करावा म्हणून संबंधित सर्व घटकांना विद्यापीठामार्फत विनंती केली जाईल.- प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ
अंतिम वर्षाच्या आॅनलाइन थेअरी परीक्षा घेताना सुरुवातीला बॅकलॉग परीक्षा २५ सप्टेंबरपासून घेण्यात येतील. तर नियमित विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्ष परीक्षा १ ते १७ आॅक्टोबरदरम्यान घेण्यात येतील. थेअरी आॅनलाइन परीक्षा बहुपर्यायी असून ५० गुणांसाठी १ तासाचा वेळ असेल. - १३ मार्च २०२० पर्यंत महाविद्यालयात शिकविलेल्या अभ्यासक्रमावर आधारित या परीक्षा होतील. आॅनलाइन परीक्षेसाठी सुविधा उपलब्ध नसल्यास स्थानिक प्रशासनाची मदत घ्यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. अपवादात्मक परिस्थितीत परीक्षा आॅफलाइन घेता येऊ शकतात.
आॅनलाइन परीक्षेनंतर प्रत्येक महाविद्यालयाने लगेचच मूल्यांकन प्रक्रिया सुरू करून विद्यार्थ्याचे गुण तयार करावेत. थेअरी परीक्षेचे मूल्यांकन ५० गुणांचे असल्यामुळे संबंधित विषयाच्या कमाल (६०, ७५, ८०, १०० इत्यादी) गुणांनुसार रूपांतर करून दोन दिवसांच्या आत विद्यापीठाच्या आॅनलाइन सिस्टिमध्ये अपलोड करावे, अशा सूचना महाविद्यालयांना विद्यापीठाने दिल्या.
अंतिम वर्ष प्रात्यक्षिक, प्रकल्प, व्हायवा परीक्षा या प्रत्येक महाविद्यालयांनी आॅनलाइन पद्धतीने झूम अॅप, गुगल यांसारख्या अॅपद्वारे व तोंडी परीक्षा फोनवरून घ्यायच्या असून, या परीक्षा १५ सप्टेंबरपासून घेण्यात येतील. शिवाय या परीक्षांचे गुणही महाविद्यालयांना तातडीने एमकेसीएल व विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड करायचे आहेत.