मॅनहोल झाकण्याचे काम अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 05:23 AM2018-05-07T05:23:28+5:302018-05-07T05:23:28+5:30
पालिकेकडून प्राप्त माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरातील अधिक वर्दळीच्या ठिकाणी मॅनहोलमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जाळी बसविण्याची कार्यवाही सध्या असून, १ हजार ४५० मॅनहोलपैकी ९०० ठिकाणी जाळ्या बसविण्यात आल्या आहेत.
मुंबई : पालिकेकडून प्राप्त माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरातील अधिक वर्दळीच्या ठिकाणी मॅनहोलमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जाळी बसविण्याची कार्यवाही सध्या असून, १ हजार ४५० मॅनहोलपैकी ९०० ठिकाणी जाळ्या बसविण्यात आल्या आहेत.
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील रेल्वे स्टेशनजवळील परिसर, मंडई, चित्रपट/नाट्यगृहे अशा सर्व वर्दळीच्या आणि पाणी साचण्याची संभाव्यता असणाऱ्या ठिकाणांपैकी जेथे मॅनहोलच्या झाकणांखाली जाळ्या लावण्याचे ठरले होते, त्या ठिकाणी जाळ्या बसविण्यात आल्याची खात्री करवून घ्यावी, असे आदेशही मुंबई महापालिकेचे आयुक्त अजय मेहता यांनी संबंधित विभागीय अधिकारी वर्गाला दिले आहेत. तथापि, वरील निकषांच्या आधारे आणखी कुठे जाळ्या बसविणे आवश्यक वाटत असल्यास, त्याबाबत संबंधित विभागस्तरीय सहायक आयुक्तांनी पर्जन्य जलवाहिन्या खात्यास कळवावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने पावसाळी पूर्व कामे हाती घेतली असून, त्यानुसार, पश्चिम रेल्वेच्या हद्दीत असणाºया महापालिकेच्या कल्व्हर्टच्या सफाई व अभियांत्रिकी कामांसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याची तयारी पश्चिम रेल्वेने दर्शविली आहे. पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील फेरीवाले हटविण्याकरिता आणि ट्रॅकवरील कचºयाचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने, रेल्वेला सहकार्य करण्याची तयारी महापालिका प्रशासनाने दर्शविली आहे. या अनुषंगाने चर्चगेट ते दहिसर दरम्यान पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील कल्व्हर्टची कामे वेळेत व योग्य प्रकारे होऊन पावसाच्या पाण्याचा प्रभावी निचरा व्हावा, या उद्देशाने महापालिका काम करत आहे.