शालार्थ आयडी प्रस्ताव तपासणी अंतिम टप्प्यात; शिक्षकांचे वेतन सुरू होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 03:52 PM2019-02-07T15:52:42+5:302019-02-07T15:53:53+5:30
राज्यातील शेकडो शिक्षकांच्या शालार्थ आयडी मान्यतेचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून लवकरच निकाली काढणार असल्याचे आश्वासन राज्याच्या शिक्षण संचालकांनी भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीला दिले आहे.
मुंबई : राज्यातील शेकडो शिक्षकांच्या शालार्थ आयडी मान्यतेचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून लवकरच निकाली काढणार असल्याचे आश्वासन राज्याच्या शिक्षण संचालकांनी भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीला दिले आहे.
भारतीय जनता पार्टी प्रदेश शिक्षक आघाडीचे मुंबई व कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी आज मंत्रालयात राज्याचे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांची भेट घेतली. भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीचे राज्य संयोजक डॉ. कल्पना पांडे, विदर्भ संयोजक उल्हास फडके, नागपूर विभाग संयोजक अनिल शिवणकर, अमरावती विभाग संयोजक नितीन खर्चे यांनी शालार्थ आयडी तातडीने निकाली काढण्याबाबत केलेल्या पाठपुराव्याबाबत अवगत केले. त्यावर शिक्षण संचालकांनी शालार्थ आयडी क्रमांक देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच निकाली काढणार असल्याचे सांगितले.
वैयक्तिक मान्यता असूनही शालार्थ आयडी मिळू न शकल्याने राज्यातील अनेक शिक्षकांना एक दोन वर्षांपासून विनावेतन काम करावे लागत आहे. मात्र, आता तातडीने याबाबत कार्यवाही होत असल्याने शिक्षकांना लवकरच वेतन सुरू होणार असल्याचे भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीचे मुंबई विभागाचे सहसंयोजक बयाजी घेरडे व सुभाष अंभोरे यांनी सांगितले.