मुंबई : अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पूल व सीडी बर्फीवाला पुलासाठी व्हीजेटीआयच्या अहवालानंतर आयआयटी मुंबईकडून मागविण्यात आलेला अहवाल पालिका प्रशासनाकडे सादर करण्यात आला. हा अहवाल दोन्ही पुलांच्या जोडणीसाठी अंतिम ठरणार आहे. शिवाय पुलाच्या संपूर्ण जोडणीत व्हीजेटीआयचे तज्ज्ञ पाहणीसाठी उपस्थित राहतील, याची काळजी घेतली जाणार आहे.
गोखले पुलाच्या पुनर्बांधणीत, बर्फीवाला पुलाला गोखले पूल जोडून जुहूपर्यंतच्या वाहतूककोंडीचा प्रश्न सोडवला जाणार होता. मात्र, काही अभियांत्रिकी दोषांमुळे गोखले पुलाची उंची २.८ मीटरनी अधिक वाढल्याने दोन पूल जोडण्याचा प्रयत्न फसला.
६० ते ९० दिवसांचा कालावधी अपेक्षित-
आयआयटीच्या अहवालानंतर आता पालिका यासाठी येणाऱ्या खर्चाचा तपशील मांडणार आहे. उत्तरेकडचे पुलाचे काम करण्यासाठी ३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. ही प्रक्रिया एप्रिल महिन्यात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या कामाला सुरुवात झाली तरी हे काम पूर्ण करण्यासाठी ६० ते ९० दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आता चारऐवजी दोन स्तंभ उंचावणार-
व्हीजेटीआयच्या अहवालानुसार बर्फीवाला पुलाचे स्लॅब उंच करण्यासाठी जॅकचा वापर करून पुलाला गोखले पुलाशी जोडता येणार आहे. त्यासाठी पुलाचे चार स्तंभ खालून वर करण्याच्या अभियांत्रिकी तंत्राचा वापर करण्यात येणार होता. मात्र, आयआयटीच्या शिफारशीनुसार ४ ऐवजी २ स्तंभ उंचावून हे काम करता येणार आहे.
पार्श्वभूमीवर पालिकेने या समस्येवर उपाय सुचविण्यासाठी आयआयटी व व्हीजेटीआयकडे सल्ला मागितला होता. व्हीजेटीआयच्या अहवालात बर्फीवाला पूल चांगल्या स्थितीत असून तो तोडण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे.
आणखी एक तज्ज्ञ सल्ला म्हणून आयआयटीकडूनही यासंबंधी अहवाल मागविण्यात आला असून तो सादर करण्यात आला आहे. या अहवालानुसार गोखले पुलाच्या जोडणीचे सर्व आरेखन हे व्हीजेटीआय करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
शिवाय पुलाच्या सुरक्षिततेसाठी, मजबुतीकरणासाठी आणि कमी वेळेत जोडणीचे काम पूर्ण करण्यासाठी आयआयटीकडून काही पर्याय सुचविण्यात आले आहेत.