फक्त शेवटच्या वर्षासाठी अंतिम सत्राच्या परीक्षा; १ सप्टेंबरपासून नवे शैक्षणिक वर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 04:15 AM2020-05-09T04:15:02+5:302020-05-09T04:27:16+5:30

इतर सत्रांतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश

Final session exams for final year only; New academic year from 1st September | फक्त शेवटच्या वर्षासाठी अंतिम सत्राच्या परीक्षा; १ सप्टेंबरपासून नवे शैक्षणिक वर्ष

फक्त शेवटच्या वर्षासाठी अंतिम सत्राच्या परीक्षा; १ सप्टेंबरपासून नवे शैक्षणिक वर्ष

Next

मुंबई : राज्यातील अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयस्तरांवरील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या केवळ अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा १ जुलै ते ३० जुलैदरम्यान होणार असून, नवीन शैक्षणिक वर्ष १ सप्टेंबरपासून सुरू होईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी दिली. इतर सत्रांच्या परीक्षा होणार नसून त्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात येईल. हा प्रवेश देताना त्यांचे ग्रेड्स व गुणही त्यांना दिले जातील, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार नाहीत, त्यांना अंतर्गत मूल्यमापनावर ५० टक्के ग्रेड व ५० टक्के यापूर्वीच्या सत्रातील परीक्षेचे गुण यावरून ठरणार आहे. पूर्वीच्या परीक्षा किंवा सत्रांचे गुण उपलब्ध नसल्यास वार्षिक सत्राच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षांबाबत १०० टक्के अंतर्गत मूल्यमापन करण्यात येईल. या गुणांबाबत काही शंका असल्यास तसेच त्यामध्ये सुधारणा करण्याची विद्यार्थ्याची इच्छा असल्यास त्याला ऐच्छिक परीक्षा देता येईल. अशा प्रकारच्या परीक्षांबाबत विद्यापीठस्तरावर निर्णय घेण्यात येईल. एखादा विद्यार्थी या परीक्षांमध्ये नापास झाला असेल तर त्यालाही पुढील वर्षात प्रवेश मिळेल, पण त्याला नापास झालेल्या विषयांची परीक्षा द्यावी लागेल. यासाठीच्या वेळापत्रकाचा निर्णय विद्यापीठस्तरावर घेण्यात येईल. एटीकेटीच्या विद्यार्थ्यांनाही हाच नियम लागू असेल.

स्वायत्त विद्यापीठांनाही हाच नियम लागू
ज्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा वार्षिक होतात, त्यांच्या केवळ अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येईल. या धोरणाप्रमाणे स्वायत्त विद्यापीठांनाही विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) निर्देशाप्रमाणे याच फॉरमॅटद्वारे परीक्षा घ्याव्या लागतील. त्यामुळे आता ४ वर्षांचा अभ्यासक्रम असणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ आठव्या सत्राची (सेमिस्टर) परीक्षा द्यावी लागेल. तसेच पाच वर्षांचा अभ्यासक्रम असणाऱ्यांना केवळ १० वी सेमिस्टर द्यावी लागेल. दोन वर्षांच्या अभ्यासक्रमांच्या केवळ चौथ्या सत्राची (सेमिस्टर) परीक्षा होणार आहे. पदविका, पदवी आणि पदव्युत्तरच्या अंतिम वर्षाच्या प्रॅक्टिकलच्या परीक्षा जर महाविद्यालयात घेता आल्या नाहीत तर विद्यार्थ्यांनी सादर केलेले जर्नल किंवा ऑनलाईन ओरल घेऊन गुण दिले जातील.

येथे मुभा
गोंडवाना विद्यापीठ हे हिरव्या पट्ट्यामध्ये (ग्रीन झोन) येत असल्यामुळे तेथील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत मुभा दिली आहे. या विद्यापीठांतर्गत गडचिरोली आणि चंद्रपूर हे जिल्हे येतात. येथील भौगोलिक परिस्थिती पाहून विद्यापीठ स्वत:च्या वेळापत्रकानुसार परीक्षा घेईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तर, एसएनडीटी विद्यापीठाच्या राज्यातील महाविद्यालयीन परीक्षा या वेळापत्रकानुसारच होतील. इतर राज्यांतील त्याच्या परीक्षेच्या वेळापत्रकानुसारच होतील.

विद्यार्थ्यांची संपूर्ण ४५ दिवस हजेरी
उन्हाळी सुट्ट्यांबाबत प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचा विचार करून प्रत्येक विद्यापीठाने त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा, अशा सूचना सामंत यांनी विद्यापीठांना दिल्या. तसेच मागील ४५ दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थी हे महाविद्यालयांमध्ये उपस्थित होते असे समजूनच त्यांची उपस्थित गृहीत धरण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता कोणत्याही संभ्रमास बळी पडू नये व आपल्या अभ्यासावर, शैक्षणिक सत्रांवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन सामंत यांनी केले.


सीईटीचा निर्णय येत्या आठ दिवसांत

सामाईक प्रवेश परीक्षांबाबत (सीईटी) नियोजनासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून, त्या समितीकडून येत्या ८ दिवसांत सीईटी परीक्षेचा निर्णय जाहीर करण्यात येईल. जिल्हास्तरावरील सीईटीचे सेंटर्स तालुकास्तरावर घेता येतील का, याचे नियोजन करण्याचा प्रयत्न या परीक्षेसाठी करण्यात येईल, अशी माहितीही सामंत यांनी दिली.

Web Title: Final session exams for final year only; New academic year from 1st September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.