Join us  

शेवटचा रविवार ठरला धामधुमीचा

By admin | Published: October 13, 2014 12:53 AM

सोमवारी सायंकाळी ५ वाजता निवडणुकीचा प्रचार थंडावणार आहे. गेले १३ दिवस सुरू असलेल्या प्रचारामध्ये विकासाचे अनेक मुद्दे चर्चेला आले

दीपक मोहिते, वसईसोमवारी सायंकाळी ५ वाजता निवडणुकीचा प्रचार थंडावणार आहे. गेले १३ दिवस सुरू असलेल्या प्रचारामध्ये विकासाचे अनेक मुद्दे चर्चेला आले. एकंदरीतच गेल्या अनेक दिवसांपासुन सुरु असलेल्या झंझावती प्रचार सभा आता थांबणार आहेत. आता मतदारराजा काय कौल देणार याकडेच उमेदवारांचे लक्ष लागले आहे.पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यात असलेल्या पश्चिम किनारपट्टीवरील तालुक्यातील नागरीकरणाला आलेला प्रचंड वेग लक्षात घेऊन आॅगस्टमध्ये आघाडी सरकारने जिल्हा विभाजनाचा निर्णय घेतला. त्यामुळे या जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व मिळवण्यासाठी सारे राजकीय पक्ष कामाला लागले. सहा विधानसभा मतदारसंघामध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्व राजकीय पक्ष हिररीने उतरले. युती व आघाडी तुटल्याने नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली व निवडणुकांच्या रिंगणात ५० उमेदवार उतरले व आजवर झालेल्या लढतीचे चित्र पालटून गेले. कोण-कोणाविरुद्ध लढतोय हेच मतदारांना कळले नाही. तो सध्या संभ्रमात पडला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये संयुक्त पुरोगामी आघाडीमधील जवळपास सर्वच पक्षांना पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर घटक पक्षांमध्ये कुरबुरी सुरू झाल्यामुळे राज्यात आघाडीमध्ये बिघाडी झाली. रिंगणामध्ये आमन-सामने असा सामना रंगू लागला. पालघर जिल्ह्यातील सहा जागांपैकी तीन जागा काँग्रेसकडे तर बविआला एक तर राष्ट्रवादीकडे तीन जागा अशी जागा वाटप असे. यंदा काँग्रेसने सहाही जागा लढवल्या तर दुसरीकडे बविआ व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समझोता झाला अशीच परिस्थिती सेना, भाजपाची आहे. या दोन्ही पक्षांनी सर्वच्या सर्व सहा जागा लढवल्या या सहाही मतदारसंघात या चार पक्षांचे २० उमेदवार रिंगणात आहेत.लढतीचे हे चित्र पहाता या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात मत विभाजनाची शक्यता आहे. त्यामुळे विजयी उमेदवार हा केवळ १० ते १२ हजाराचे मतधिक्य होऊन निवडणून येईल. गेल्या १३ दिवसात झालेल्या प्रचारामध्ये प्रत्येक पक्षाने परिसर विकासाचा विषय हाताळला. समुद्रकिनारी असलेले वसई, नालासोपारा, पालघर, बोईसर, व डहाणू या मतदारसंघातील विकासाचे प्रश्न व ग्रामीण भागातील विक्रमगड मतदारसंघाच्या विकासाचे प्रश्न भिन्न स्वरुपाचे आहेत. विक्रमगड वगळता पाच मतदारसंघात पाणी, मासेमारी, बेरोजगारी, दळणवळणाचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालले आहे. येत्या पाच वर्षात या मतदारसंघाची लोकसंख्या ३५ ते ४० लाखाच्या घरात जाण्याची शक्यता आहे.