Join us

अंतिम वर्षाच्या परीक्षा होणे अवघडच; राज्य शासनाकडून विद्यापीठ अनुदान आयोगास पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 5:25 AM

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून सामंत यांनी मंगळवारी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

मुंबई : विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि मानसिकतेचा विचार करून अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा न घेता ग्रेडिंग देऊन पदवी देण्यात यावी, असे पत्र राज्य शासनाकडून विद्यापीठ अनुदान आयोगास देण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. मात्र, सीईटीच्या परीक्षा होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून सामंत यांनी मंगळवारी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. बारावीनंतरच्या सीईटीच्या परीक्षा मात्र होणार असून त्यांच्या तारखा त्यांनी जाहीर केल्या असल्या तरी त्याबाबतही परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी म्हटले.

पदवीसाठी असणारी सीईटी परीक्षा जुलैमध्ये घेण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावर होणारी परीक्षा ही तालुक्याच्या ठिकाणी घेतली जाईल. तसेच जे विद्यार्थी आपल्या मूळ रहिवासाच्या ठिकाणी गेले आहेत किंवा ज्यांना निवडलेल्या परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे शक्य होणार नसेल याचा विचार करून त्यांना निवडलेले परीक्षा केंद्र बदलण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.टाळेबंदीमुळे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत जाणे शक्य होणार नाही, त्यांची व्यवस्था विभागाकडून करण्यात येईल, अशी माहितीही सामंत यांनी दिली.

इतर प्रवेशप्रक्रिया सुरूराज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पदव्युत्तर वैद्यकीय व पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. टाळेबंदीमुळे किंवा तांत्रिक अडचणीमुळे आॅनलाईन लिंक सुरू होऊ शकल्या नाहीत तर त्या लिंक पुन्हा सुरू करण्यात येतील. ज्यांच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत, अशा विद्यार्थ्यांनी भरलेले परीक्षा शुल्क त्यांना परत देण्याबाबत अथवा ते शुल्क पुढच्या सत्रात वापरता येईल का, याबद्दल लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :परीक्षाशिक्षण