Join us

आजपासून अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:06 AM

मुंबई विद्यापीठ : विविध शाखांतील दीड लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभागलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील १३ अकृषी विद्यापीठाच्या ...

मुंबई विद्यापीठ : विविध शाखांतील दीड लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील १३ अकृषी विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाच्या कला, वाणिज्य व विज्ञान विद्याशाखेच्या पदवीच्या अंतिम वर्षाच्या सत्र ६च्या परीक्षा गुरुवारपासून ऑनलाइन सुरू हाेतील. दीड लाखांहून अधिक विद्यार्थी ही परीक्षा देणार असून, यासाठी सर्व महाविद्यालयांकडून परीक्षांची तयारी झाली झाल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.

मुंबई विद्यापीठाने कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील परीक्षेचे नियोजन व्यवस्थित केल्यामुळे हिवाळी सत्राच्या अंतिम वर्ष सत्र ५च्या परीक्षा डिसेंबर - जानेवारीदरम्यान घेण्यात आल्या. या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान जाहीर झाला. यामुळे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या सत्र ६च्या परीक्षा मे २०२१ मध्ये घेण्याचा निर्णय घेतला. यानुसार या परीक्षा होणार असून, प्रत्येक महाविद्यालय हे स्वतंत्र वेळापत्रक आणि नियोजनानुसार ६ मे ते २१ मेदरम्यान या परीक्षा ऑनलाइन घेणार आहे. विविध विद्याशाखेच्या अंतिम वर्षाच्या ४५ परीक्षेमध्ये एक लाख ५५ हजार १५५ विद्यार्थी परीक्षा देतील.

* अंतिम वर्षाच्या ४५ परीक्षा

पदवीच्या अंतिम वर्षाच्या सत्र ६च्या बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी, बीएमएस, बीएमएम, बी.कॉम अकाउंट ॲण्ड फायनान्स, बीकॉम बँकिंग ॲण्ड इन्शुरन्स, बीकॉम फायनान्शियल मार्केट, बीएसस्सी बायोटेक्नॉलॉजी, बीएसस्सी काॅम्प्युटर सायन्स, बीएस्सी आयटी, बीएस्सी हॉस्पिटॅलिटी स्टडीज यासह मानव्य, वाणिज्य, विज्ञान व आंतरशाखीय विद्याशाखेच्या एकूण ४५ परीक्षा आजपासून सुरू हाेतील.

९४ समूह व ४५० महाविद्यालये

परीक्षेच्या आयोजनासाठी विद्यापीठाने सर्व विद्याशाखांच्या महाविद्यालयाचे समूह तयार केलेले असून, प्रत्येक क्लस्टरमधील एका महाविद्यालयास लीड महाविद्यालय अशी जबाबदारी देण्यात आलेली आहे. अशा एकूण ९४ लीड महाविद्यालयावर परीक्षांची जबाबदारी सोपविण्यात आली असून, त्यांच्या अंतर्गत ४५०हून अधिक महाविद्यालये ऑनलाइन परीक्षांचे नियोजन करणार आहेत, परीक्षेसाठी विद्यापीठाचा परीक्षा विभाग सज्ज झाल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.

* संपूर्ण वर्ष ऑनलाइन शिक्षणाचे

उन्हाळी सत्राच्या परीक्षा अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. कोविडच्या साथीमुळे विद्यार्थ्यांचे हे संपूर्ण वर्ष ऑनलाइन शिक्षणाचे होते व परीक्षाही ऑनलाइन होत आहेत. विद्यार्थ्यांनी भीती न बाळगता परीक्षा द्याव्यात, त्यासाठी त्यांना शुभेच्छा आहेत.

- डॉ. सुहास पेडणेकर,

कुलगुरु, मुंबई विद्यापीठ

------------------