अंतिम वर्षाचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:18 AM2020-11-22T09:18:49+5:302020-11-22T09:18:49+5:30
निकाल लागूनही प्रतीक्षा : लिखित प्रमाणपत्र देण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क मुबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल-मे मध्ये होणारी अंतिम ...
निकाल लागूनही प्रतीक्षा : लिखित प्रमाणपत्र देण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल-मे मध्ये होणारी अंतिम वर्षाची परीक्षा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झाली. मुंबई विद्यापीठाने निकालही तातडीने लावला. मात्र अद्याप विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यात आली नाही.
गुणपित्रका न मिळाल्याने विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी व नोकरीसाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना तातडीने गुणपत्रिका देण्यासाठी विद्यापीठाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रदीप सावंत व राजन कोळंबेकर यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना पत्राद्वारे केली आहे. आयडॉलच्या विद्यार्थ्यांचीही परिस्थिती सारखीच आहे. तेदेखील गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत आहेत.
आधीच कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना केवळ गुणपत्रिका वेळेवर न दिल्याने नोकरी गमावणे परवडणारे नसल्याची प्रतिक्रिया नुकतीच बीकॉमची परीक्षा आयडॉलमधून पास झालेल्या एका विद्यार्थ्याने दिली. विद्यापीठाने लवकरात लवकर गुणपत्रिका द्यावी किंवा आम्हाला पर्यायी लिखित प्रमाणपत्र तरी द्यावे, अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत.