मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन कर्जतकडे जाणारी पहिली लोकल सीएसएमटी स्थानाकवरुन 6.57 मिनिटांनी रवाना झाली. या लोकलने 8.32 मिनिटांनी बदलापूर स्टेशन सोडले. बदलापूरपासून कर्जतकडे निघालेल्या लोकलला पाहून हजारो प्रवाशांना आनंद झाला होता. शुक्रवारी रात्रीपासून पावसाच्या व्यत्ययामुळे बंद असलेला सीएसएमटी ते कर्जत लोकल रेल्वेमार्ग अखेर सुरू झाला. त्यानंतर हजारो प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.
मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल रेल्वेचा शनिवारी चांगलाच खोळंबा झाल्याचे पाहायला मिळाले. महालक्ष्मी एक्सप्रेस वांगणी येथे फसल्यानंतर कर्जतकडे येणाऱ्या सर्वच लोकल गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मुंबईकडून कर्जतकडे आणि कर्जकडून मुंबईकडे येणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत होते. तर, लोकल कधी सुरू होणार, याकडेच हे चाकरमानी डोळे लावून बसले होते. अखेर, 20 तासांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर ही लोकलसेवा पूर्ववत करण्यात आली आहे. त्यामुळे बदलापूर स्थानकावरील प्रवाशांच्या आनंद नक्कीच डोळे दिपवणारा होता. या प्रवाशांच्या चेहऱ्यावरील हास्य, शेतकऱ्याला पावसाने मिळावा असाच आनंद देणारे होते. दरम्यान, या काळात प्रवाशांनी दाखवलेल्या धैर्याबद्दल मध्य लोकल रेल्वेचे अधिकारी सुनिल देसाई यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.