अखेर शेकडो गिरणी कामगारांची स्वप्नपूर्ती; बॉम्बे डाइंग, श्रीनिवास मिलच्या कामगारांना मिळाले घर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 11:57 AM2023-11-17T11:57:35+5:302023-11-17T11:58:29+5:30
चाव्या मिळाल्याचा आनंद गिरणी कामगारांच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होता.
मुंबई : बॉम्बे डाइंग मिल व श्रीनिवास मिलमधील गिरणी कामगारांसाठी २०२०मध्ये जाहीर केलेल्या सोडतीतील १०० गिरणी कामगार/वारस यांना वांद्रे पूर्व येथील म्हाडाच्या मुख्यालयात म्हाडा व गिरणी कामगार घर संनियंत्रण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी आयोजित कार्यक्रमात घरांच्या चाव्या देण्यात आल्या.
गिरणी कामगार घर संनियंत्रण समितीचे अध्यक्ष व आमदार सुनील राणे, आमदार कालिदास कोळंबकर, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, उपमुख्य अधिकारी योगेश महाजन यावेळी उपस्थित होते. आतापर्यंत २०२० मध्ये गिरणी कामगारांसाठी काढण्यात आलेल्या सोडतीतील यशस्वी पात्र व घरांच्या विक्री किमतीचा, मुद्रांक शुल्काचा भरणा केलेल्या १ हजार ३१० गिरणी कामगारांना १५ जुलैपासून सहा टप्प्यांत सदनिकांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले आहे. चाव्या मिळाल्याचा आनंद गिरणी कामगारांच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होता.
दिवाळीच्या मुहूर्तावर हक्काच्या घरात
सातव्या टप्प्यातील कार्यक्रमाच्या माध्यमातून दिवाळीच्या मुहूर्तावर स्वतःच्या हक्काच्या घरात प्रवेश करण्याची संधी गिरणी कामगार / वारस यांना मिळाली आहे. उर्वरित गिरणी कामगारांच्या पात्रता निश्चितीचे काम वेगाने सुरू असून, विक्री किमतीचा व मुद्रांक शुल्क भरणा भरणा केलेल्या पात्र गिरणी कामगारांना लवकरच घरांच्या चाव्यांचे वाटप केले जाईल.
पात्रता निश्चिती अभियान
५८ बंद/आजारी गिरण्यांमधील यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण १,५०,४८४ गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती करण्याकरिता अभियान सुरू आहे. ऑफलाइन कागदपत्रे भरण्याचे काम वांद्रे पूर्व येथील समाज मंदिर हॉलमध्ये सुरू आहे.
विनामूल्य सुविधा
ऑनलाइन पद्धतीने संकेतस्थळावर कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा विनामूल्य उपलब्ध असून, ॲण्ड्रॉइड व्हर्जनच्या मोबाइलमध्ये गुगल ड्राइव्हच्या प्ले स्टोअर आणि आयओएस व्हर्जन ॲप स्टोअरमध्ये ॲप उपलब्ध करून दिले आहे.
रायगड जिल्ह्यातील कोन येथे एमएमआरडीएने बांधलेल्या घरांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. घरांच्या विक्री किमतीचा भरणा केलेल्या सोडतीतील विजेत्या पात्र गिरणी कामगार / वारसांना पहिल्या टप्प्यांतर्गत इमारत क्रमांक ३ व ४ मधील ५०० घरांच्या चाव्यांचे वाटप लवकरच करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सोडतीतील उर्वरित गिरणी कामगार / वारस यांची पात्रता निश्चित करण्याचे काम सुरू आहे.
- आ. सुनील राणे, अध्यक्ष, गिरणी कामगार घर संनियंत्रण समिती