अखेर मनिषा कायंदे यांच्यावर कारवाई, ठाकरेंच्या शिवसेनेचं परिपत्रक जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 07:26 PM2023-06-18T19:26:55+5:302023-06-18T19:42:07+5:30

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना, कधीही माफ करणार नाही, असे म्हटले होते.

Finally action against Manisha Kayande, Thackeray's Shiv Sena circular issued | अखेर मनिषा कायंदे यांच्यावर कारवाई, ठाकरेंच्या शिवसेनेचं परिपत्रक जारी

अखेर मनिषा कायंदे यांच्यावर कारवाई, ठाकरेंच्या शिवसेनेचं परिपत्रक जारी

googlenewsNext

मुंबई - शिवसेनेचा वर्धापन दिन शिंदे गट आणि ठाकरे गटाकडूनही साजरा केला जात आहे. मात्र, वर्धापनदिनाच्या आधीच ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. मनिषा कायंदे आणि शिशिर शिंदे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्याची माहिती आहे. त्यापैकी मनिषा कायंदे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. यावरून ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला असून, मनिषा कायंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. आता, ठाकरे गटाकडून मनिषा कायंदे यांची पक्षाच्या प्रवक्ते पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. या संदर्भातील पत्रही शिवसेना ठाकरे गटाने जारी केले आहे.  

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना, कधीही माफ करणार नाही, असे म्हटले होते. त्यानंतर, आज त्यांच्याच सहीने मनिषा कायंदे यांची पक्षाच्या प्रवक्ते पदावरुन हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येत असल्याचंही त्या पत्रात म्हटले आहे. राज्यात १९ जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होत आहे. तत्पूर्वी, राज्यव्यापी पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज वरळीत पार पडला. या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. त्यानंतर, काही वेळातच मनिषा कायंदे यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे पत्र शिवसेनेनं जारी केलं आहे. 

शिवसेनेच्या वर्धापन दिनासाठी ठाकरे गट आणि शिंदेंची शिवसेना दोन्ही गटांनी जोरदार तयारी केली आहे. या वर्धापन दिनापूर्वीच, विधान परिषदेतील आमदार असलेल्या मनिषा कायंदे गेल्या काही काळापासून ठाकरे गटात नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर आता मनिषा कायंदे नॉट रिचेबल आहेत. मनिषा कायंदे आता शिवसेनेच्या वर्धापन दिनादिवशी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाकडून जोरदार टीका केली जात आहे.

गद्दारी, बेईमानी केली, कधीही माफ करणार नाही

सत्तापिपासू, स्वार्थी आणि संधीसाधू विधान परिषेदच्या आमदार शिंदे गटात जाणार आहेत. याची कल्पना आम्हाला दोन महिन्यांपासून होती. विधान परिषदेवर पुन्हा संधी मिळण्यासाठी गद्दारी आणि बेईमानी केली आहे. यांना राजकारणात काडीचीही किंमत नव्हती, तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. एवढा मोठा मानसन्मान प्राप्त करून दिला. शिवसेना पक्षाला गरज असताना उपकारकर्त्यांशी बेईमानी करून सत्तेसाठी राजकारणाच्या डबक्यात उडी मारत आहेत. तुम्हाला नियती कधीही माफ करणार नाही, या शब्दांत विनायक राऊतांनी टीकास्त्र सोडले.
 

Web Title: Finally action against Manisha Kayande, Thackeray's Shiv Sena circular issued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.