मुंबई : महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी या वर्षी २ जानेवारीला राजीनामा दिला. सात महिन्यांनंतर अखेर तो स्वीकारण्यात आला आहे. या पदावर नवीन नियुक्ती अद्याप करण्यात आली नसली तरी नवीन मंडळाची पुनर्रचना करण्याची बाब विचाराधीन असल्याचे अध्यादेशात म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळात अध्यक्षांसह २३ सदस्य होते. राज्यात सेना-भाजपचे सरकार गेल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले. यातील मराठी भाषेचा गाजावाजा करणाऱ्या शिवसेनेकडेच मराठी भाषा विभागाचे मंत्रीपदही आले. मंडळाचे अध्यक्ष करंबेळकर यांनी सरकार बदलल्याने २ जानेवारी २०२०ला आपला राजीनामा मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे सादर केला होता. तो दोन दिवसांपूर्वी मंजूर केला असून, त्यासाठी राज्य शासनाने अध्यादेशही काढला. सरकारने तब्बल सात महिन्यांची दिरंगाई केल्याने मराठी भाषाप्रेमींकडून मात्र नाराजी व्यक्त केली जात आहे. राज्य मराठी विकास संस्थेमध्ये नियामक मंडळावर २१ अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. अशासकीय सदस्यांची नव्याने नियुक्ती करण्याची बाबही विचाराधीन आहे.