अखेर युती : शिवसेना ७५ तर भाजपा ४०
By admin | Published: May 27, 2015 10:57 PM2015-05-27T22:57:58+5:302015-05-27T22:57:58+5:30
वसई-विरार महापालिकेसाठी शिवसेना-भाजपाची युती झाल्याची घोषणा शिवसेना उपनेते अनंत तरे आणि भाजपाचे ठाणे ग्रामीणचे अध्यक्ष खासदार कपिल पाटील यांनी बुधवारी केली.
ठाणे : गेल्या काही दिवसांपासून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असतांना अखेरच्या टप्प्यात वसई-विरार महापालिकेसाठी शिवसेना-भाजपाची युती झाल्याची घोषणा शिवसेना उपनेते अनंत तरे आणि भाजपाचे ठाणे ग्रामीणचे अध्यक्ष खासदार कपिल पाटील यांनी बुधवारी केली. शिवसेना ११५ पैकी ७५ तर भारतीय जनता पक्ष ४० जागा लढविणार आहे. जनआंदोलन समितीचे विवेक पंडित आणि आरपीआयचे रामदास आठवले यांना युतीतील वाट्याच्या काही जागा सोडण्यात येणार आहेत.
ज्या १२ जागांसाठी युतीची चर्चा अडली होती, तो प्रश्नही आता सामंजस्याने स्थानिक आणि वरिष्ठ नेत्यांच्या समन्वयाने सोडविण्यात आल्याचेही या वेळी तरे यांनी सांगितले. शिवसेनेचे उपनेते विवेक पंडित यांच्या जनआंदोलन समितीशीही चर्चा सुरू असून त्यांना शिवसेना आणि भाजपाच्या वाट्यातून काही जागा देण्यात येणार आहेत. मात्र, त्या देताना त्यांना शिवसेनेच्या चिन्हावरच निवडणूक लढवावी लागेल, असे सांगण्यात आले आहे. आरपीआय आणि पंडितांबरोबरची चर्चाही आता अंतिम टप्प्यात असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
मंगळवारी भिवंडीतील खासदार कपिल पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली होती. तिथे प्रश्न न सुटल्यामुळे पुन्हा बुधवारी दुपारी ३ वा.च्या दरम्यान राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या मुंबईतील निवासस्थानी झालेल्या चर्चेच्या प्रसंगी भाजपाच्या वतीने पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा, खा. कपिल पाटील, पालघर जिल्हा संघटक राजन नाईक, तर शिवसेनेच्या वतीने कदम यांच्यासह पालघर जिल्हा संपर्कप्रमुख व उपनेते अनंत तरे, सहसंपर्कप्रमुख केतन पाटील, जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, तालुकाप्रमुख निलेश तेंडुलकर, युवासेनेचे केदार दिघे आदी उपस्थित होते. युतीबाबत वरिष्ठांशी चर्चा करून ती यशस्वी केल्याचे उभय नेत्यांनी ठाण्यातील पत्रकार परिषदेत सांगितले. या युतीमुळे वसई-विरार महापालिकेवर शिवसेना-भाजपाचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.
(प्रतिनिधी)
प्रचार संयुक्तपणे होणार
वसई-विरार महापालिकेवर युतीचा झेंडा फडकवून स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करण्यासाठी प्रचाराचीही जोरदार तयारी झाली आहे. त्यासाठी तालुका आणि प्रभागवार प्रचाराची रणनीती आखण्यात आली आहे. युती झाल्यामुळे प्रचारही संयुक्तपणे होणार असून एकमेकांच्या प्रभागांमध्ये शिवसेना आणि भाजपाचे नेते प्रचारासाठी येणार आहेत. शिवसेनेच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तर भाजपाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी नेत्यांच्या प्रचारसभाही होणार आहेत.
आरपीआयशी बोलणी सुरू....
जो फॉर्म्युला पंडितांसाठी आहे, तोच आरपीआयसाठीदेखील आहे. त्यांनाही शिवसेना आणि भाजपाच्या वाट्याला आलेल्या काही जागा सोडण्यात येणार आहेत. त्यांना मात्र त्यांच्या चिन्हावर निवडणुका लढविण्याची मुभा देण्यात येणार आहे. याबाबत, आरपीआयचे नेते रामदास आठवले यांच्याशीही अंतिम टप्प्यात बोलणी सुरू असल्याचे तरे यांनी सांगितले.
...तर कारवाईचा निर्णय पक्षप्रमुखांचा असेन
जनआंदोलन समितीचे नेते विवेक पंडित यांच्या वाट्याला आलेल्या जागांवर त्यांनी शिवसेनेच्या चिन्हावर जर निवडणूक लढविली नाही तर त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करण्याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव यांचा असेन, असेही तरे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.
नाराजी दूर करणार
जागावाटपामध्ये जे कार्यकर्ते नाराज झाले असतील, त्यांची नाराजी दूर करण्यात येणार असून कोणीही बंडखोरी करणार नाही, याची खबरदारी घेतल्याचेही तरे यांनी या वेळी सांगितले.
श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष आणि जनआंदोलन पार्टीचे सर्वेसर्वा विवेक पंडित यांच्या उमेदवारांनी गेल्या वेळी ज्या सात ते आठ जागा जिंकल्या होत्या, त्या त्यांना देण्याची शिवसेना आणि भाजपा या दोघांचीही तयारी आहे. फक्त त्या शिवसेनेच्या चिन्हावर लढवाव्यात, असा आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे या वेळी सांगण्यात आले.