अखेर राखीव निकाल जाहीर, पुनर्मूल्यांकन तपासणी सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 05:00 AM2017-10-18T05:00:36+5:302017-10-18T05:00:55+5:30
मुंबई विद्यापीठात आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे निकालांना उशीर झाला. त्यात उत्तरपत्रिकांची सरमिसळ झाल्याने काही उत्तरपत्रिका विद्यापीठाला सापडत नसल्याने २ हजार ३०० विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले होते.
मुंबई : मुंबई विद्यापीठात आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे निकालांना उशीर झाला. त्यात उत्तरपत्रिकांची सरमिसळ झाल्याने काही उत्तरपत्रिका विद्यापीठाला सापडत नसल्याने २ हजार ३०० विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले होते. यामुळे हे विद्यार्थी त्रस्त होते. पण, अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर विद्यापीठाने राखीव निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांना एक प्रकारे दिवाळीची भेट दिली आहे. तरीही तब्बल ३० हजार पुनर्मूल्यांकनाच्या उत्तरपत्रिकांची तपासणी अजूनही सुरू आहे.
आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीत अनेक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची सरमिसळ झाली होती. निकाली प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्यावरही सरमिसळ झालेल्या उत्तरपत्रिकांचा शोध लागत नव्हता. अखेर या विद्यार्थ्यांना सरासरी गुण द्यायचे असा विद्यापीठाने निर्णय घेतला. सरासरी गुण देऊन मंगळवारी विद्यापीठाने तब्बल २ हजार
३०० विद्यार्थ्यांचे निकाल ँ३३स्र://६६६.े४े१ी२४’३२.्रल्ल/ या संकेतस्थळावर जाहीर केले.
२ हजार ३०० विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाले आहेत. पण, सुमारे ३ हजार ७०० उत्तरपत्रिका अजूनही सापडलेल्या नाहीत. सरासरी गुणांविषयी आखलेल्या नियमावलीनुसार प्रत्येक विद्यार्थ्याची विषयांसह गुणांची आणि हजेरीची तपासणी करून विद्यार्थ्यांना गुण बहाल करण्यात आल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अर्जुन घाटूळे यांनी सांगितले.
पुनर्मूल्यांकनासाठी आलेल्या ५२ हजार ६४१ अर्जांपैकी २० हजार ८०२ एवढे पुनर्मूल्यांकनाचे निकाल मुंबई विद्यापीठाने जाहीर केले आहेत. तर उर्वरित ३१ हजार ८३९ अर्जांच्या निकालाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच हे काम संपवून निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.
असे दिले सरासरी गुण
सरासरी गुण देण्याच्या नियमावलीनुसार विद्यार्थ्यांना आधीच्या विषयात मिळालेल्या गुणांच्या आधारावर ज्या विषयाची उत्तरपत्रिका आढळून आली नाही, त्या विषयासाठी सरासरंी गुण देण्यात आले आहेत. या २ हजार ३०० विद्यार्थ्यांमध्ये एका विषयाची उत्तरपत्रिका न आढळलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे जवळपास ९० टक्के एवढे असून, २ विषयांच्या उत्तरपत्रिका गहाळ असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे सुमारे १० टक्के इतके असल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे.