अखेर औरंगाबादला नवे आयुक्तालय
By Admin | Published: June 1, 2017 03:18 AM2017-06-01T03:18:18+5:302017-06-01T03:18:18+5:30
राज्यात शासनाचा मृद व जलसंधारण असा स्वतंत्र विभाग व त्यासाठी औरंगाबाद येथे स्वतंत्र आयुक्तालय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात शासनाचा मृद व जलसंधारण असा स्वतंत्र विभाग व त्यासाठी औरंगाबाद येथे स्वतंत्र आयुक्तालय स्थापन करण्याचा शासनादेश बुधवारी अखेर निघाला. नवीन विभागाच्या निर्मितीस व त्याकडे आपले कर्मचारी वर्ग करण्यास कृषी व जलसंपदा विभागाने विरोध केला होता.
मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या अखत्यारित असणाऱ्या सध्याच्या जलसंधारण विभागाचे नाव बदलून आता ते ‘मृद व जलसंधारण विभाग’ करण्यात आले आहे. आता जलसंपदा, कृषी या विभागांकडील संबंधित कर्मचारी वर्गाची आस्थापना या नवीन विभागाकडे वर्ग होणार आहे. १६ हजार ४७९ कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधास मान्यता देण्यात आली आहे.
औरंगाबाद येथील जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) या संस्थेच्या स्वायतत्तेस बाधा न आणता ही संस्था जलसंपदा विभागाकडून नवीन विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे. संस्थेच्या आवारातच मृद व जलसंधारण आयुक्तालयाची निर्मिती केली जाणार आहे.
जलयुक्तच्या कामांना वेग येईल
मृद व जलसंधारण हा नवीन विभाग स्थापन झाल्यामुळे विखुरलेली कामे एकाच विभागामार्फत होतील. त्यामुळे कामांचा वेग व दर्जाही वाढण्यास मदत होईल. नवीन विभागाचे काम लवकरात लवकर सुरु होण्यासाठी आपण सोमवारपासून बैठकांना सुरुवात करणार आहोत. लवकरच या आयुक्तालयाचे काम प्रत्यक्षात सुरु होईल.
- प्रा. राम शिंदे, जलसंधारण मंत्री