- गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई : ‘रेमडेसिविर इंजेक्शनसाठी मी शेकडो लोकांशी संपर्क केला. अखेर दोन रेमडेसिविर मिळाले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला हाेता. लढाई संपली हाेती आणि मी हरलो होतो...’ हताश अवस्थेतील हे उद्गार आहेत राजेश सावंत यांचे. त्यांच्या पत्नी राजेश्वरी यांचा कोरोनाने बळी घेतला. लॅबकडून कोरोना चाचणी अहवाल न मिळाल्याने हे घडल्याचा त्यांचा आराेप असून याप्रकरणी त्यांनी चौकशीची मागणी केली आहे.
मधुमेही असलेल्या राजेश्वरी (वय ४१) यांच्या ९ एप्रिलला पोटात दुखू लागले व श्वास घेण्यास ही त्रास होऊ लागला. राजेश यांनी १० एप्रिल रोजी डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी काेविड चाचणी करण्यास सांगितल्याने त्यांनी आर. दक्षिणच्या लॅबमध्ये राजेश्वरी यांची अँटीजेन चाचणी केली, जी निगेटिव्ह आली. मात्र त्यांची लक्षणे संशयास्पद असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने आरटीपीसीआर चाचणी केली. त्याच दिवशी दुपारी राजेश यांना पालिकेकडून फोन आला व राजेश्वरी यांना कोरोना असल्याचे सांगत रुग्णवाहिका पाठवून बीकेसी जंबो कोविड सेंटरमध्ये त्यांना दाखल केले.
वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी पत्र लिहून बीकेसी सेंटरला राजेश्वरी यांना दाखल करून घेण्यास सांगितले. मात्र दोन दिवस उपचार घेऊनही प्रकृती अधिकच ढासळल्यामुळे राजेश यांनी बीकेसीतून डिस्चार्ज घेत १३ एप्रिल, २०२१ रोजी मालाडच्या सरस्वती रुग्णालयात त्यांना दाखल केले. पण लॅबने त्यांना कोविड पाॅझिटिव्ह असल्याचा अहवाल दिलाच नाही. अहवाल अभावी सरस्वती रुग्णालय रेमडेसिविर इंजेक्शनची सोय करू न शकल्याने सिटी स्कॅन करण्याचा निर्णय तिथल्या डॉक्टरने घेतला. कसेबसे रेमडेसिविर मिळाले, पण तोपर्यंत राजेश्वरी यांची ऑक्सिजन लेवल कमी झाली हाेती व अखेर त्यांचा मृत्यू झाला. तरीही १० एप्रिल,२०२१ रोजी करण्यात आलेल्या आरटीपीसीआरचा अहवाल अद्यापही राजेश यांना मिळालेला नाही.
कोरोना अहवाल निगेटिव्ह!राजेश्वरी यांच्या १० एप्रिल, २०२१ रोजी करण्यात आलेल्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आहे. या चाचणीत कोरोना ट्रेस होईलच असे नसल्याने लक्षणे असलेल्या रुग्णाला आम्ही पुन्हा चाचणी करण्यास सांगताे. राजेश्वरी यांची ऑक्सिजन लेवल व अन्य अहवालावरून त्या कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्याने आम्ही त्यांना बीकेसी सेंटरमध्ये पाठविले.- डॉ. विशाल देशमुख, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आर. दक्षिण विभाग
शर्थीचे प्रयत्नही अपयशीरुग्णाकडे कोविड पॉझिटिव्ह अहवाल असेल तरच आम्ही सरकारकडे रेमडेसिविरची मागणी करू शकतो. राजेश्वरी यांचा अहवाल त्यांच्याकडे नव्हता. त्या रुग्णालयातही उशिरा आल्या. त्यामुळे आमचे शर्थीचे प्रयत्नही अपयशी ठरले.- डॉ. अखिलेश शुक्ला, सरस्वती रुग्णालय