मुंबई : ज्येष्ठ नागरिकांना बेस्ट बसच्या विनावातानुकूलित बस भाड्यामध्ये ५० टक्के सवलत देण्यासाठी, महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात ३ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या तरतुदीनुसार नवी योजना तयार करत असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली.शालेय विद्यार्थ्यांप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांनाही आरएफआयडी कार्ड्स देण्यात येणार आहेत. बेस्ट त्याप्रमाणे योजना तयार करणार आहे. ही योजना पालिकेसमोर सादर झाल्यानंतर, ३ कोटी रुपयांमधील रक्कम टप्प्याटप्प्याने बेस्ट प्रशासनाला दिली जाईल, अशी माहिती बेस्ट प्रशासनाने दिली. आरएफआयडी कार्ड्सचा मोठा वितरण सोहळादेखील आयोजित करण्याचे नियोजित असल्याचे सूत्रांनी सांगितले. अंध व अपंगव्यक्तींसाठी ५० टक्क्यांपेक्षा अधिक सवलत किंवा १०० टक्के सवलत देण्याचा बेस्ट प्रशासन विचार करत आहे.पालिकेने तरतूद करूनही बस भाड्यामध्ये सवलत मिळत नसल्याची तक्रार ज्येष्ठ नागरिक करत आहेत, तर दुसरीकडे बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी सांगितले की, २०१६-१७ या आर्थिक वर्षामध्ये बेस्ट उपक्रमातर्फे स्वातंत्र्य सैनिक, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व पत्रकार यांना सवलतीच्या दरात भाडे आकारण्यात आले. त्याचा ४५.२९ कोटी रुपयांचा अधिभार बेस्टला सोसावा लागला आहे.मात्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी अशी योजना यापूर्वीच तयार करण्यात आली होती. नव्याने योजना तयार का करावी लागत आहे, असा सवालज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित केला आहे. या आधी तरतूद १ कोटी रुपयांची होती. अद्याप या योजनेचा लाभज्येष्ठ नागरिकांना मिळत नसल्याची तक्रार ज्येष्ठ नागरिकांकडून होत आहे.
अखेर ‘बेस्ट’ला आली ‘ज्येष्ठां’ची आठवण! भाड्यामध्ये ५० टक्के सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 3:14 AM