अखेर भातसा धरण ओव्हरफ्लो; मुंबईकरांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 01:06 AM2018-08-22T01:06:55+5:302018-08-22T06:43:25+5:30
मुंबईसह उपनगरांची तहान भागवणारे भातसाही काठोकाठ भरले असून या धरणाचे पाचही दरवाजे मंगळवारी उघडण्यात आले आहेत.
भातसानगर : आठवडाभराच्या उसंतीनंतर पुन्हा एकदा सक्रिय झालेल्या पावसाने धरणक्षेत्रासह सर्वत्र दमदार बॅटिंग केल्याने मुंबईसह उपनगरांची तहान भागवणाऱ्या प्रमुख जलाशयांच्या पातळीत वाढ झाली आहे. मुंबईसह उपनगरांची तहान भागवणारे भातसाही काठोकाठ भरले असून या धरणाचे पाचही दरवाजे मंगळवारी उघडण्यात आले आहेत. यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणारी तानसा, वैतरणा तसेच अप्पर वैतरणा ही धरणे आधीच भरून वाहिली. मात्र, भातसा धरण भरून वाहणे बाकी होते. काही दिवसांपासून तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याचे भातसा उपविभाग क्र. १ चे कार्यकारी अभियंता वाय.बी. पाटील यांनी सांगितले.
दुपारी एक वाजता धरणाचे तीन दरवाजे १५ सेंमी.ने वर उचलून पाणी सोडण्यात आले. त्यामधून ६८.६७ मीटर ट्यूब प्रतिसेकंद इतक्या पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. त्यानंतर मात्र पाण्याची पातळी तब्बल १४०.०७ एवढी वाढल्याने सुरक्षेच्या कारणाने धरणाचे पाचही दरवाजे संध्याकाळी उघडण्यात येऊन ४१०२ क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग करण्यात येऊ लागला.
साजिवली, सावरशेत, सरलांबे, सापगाव, हिव, अंदाडसह नदीकिनारी असलेल्या सर्व गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सतत पडणाºया या पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्यातील सर्व धरणे आता पूर्ण भरल्याने मुंबईकरांना आता पाणीकपातीला सामोरे जावे लागणार नाही.
पावसाची संततधार सुरू असल्याने भातसा जलाशयाचे दरवाजे उघडण्यात आले असून अतिदक्षता म्हणून भातसा जलाशयालगतच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. - रवींद्र बाविस्कर,
तहसीलदार, शहापूर
भातसा धरणाची भरून वाहण्याची पाणी पातळी ही १४२ मीटर इतकी आहे. मात्र, धरणातील पाणी साठा मर्यादित ठेवण्यासाठी पाचही दरवाजे उघडण्यात आले आहेत. जसजसा पाण्याचा ओघ कमी होईल, त्यानुसार दरवाजे बंद करण्यात येतील.
- वाय.बी. पाटील, कार्यकारी अभियंता, भातसानगर