लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रभाग क्रमांक ८४ मध्ये सुरू होणारा तसेच प्रभाग क्रमांक ७० मध्ये उतरणारा कॅप्टन विनायक गोरे उड्डाणपूल आणि उड्डाणपुलावरील काही रस्त्यालगत विजेचे दिवे स्ट्रीट लाईट गेले कित्येक महिने बंद होती. या संदर्भात ‘लोकमत’च्या दि. १८च्या अंकात वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यात वृत्तात म्हटले होते की, पुलावरून लाडक्या बाप्पाला अनंत चतुर्दशी दिवशी निरोप द्यावा लागणार आहे. तसेच विलेपार्ले पूर्वेकडून जुहू बीच येथे विसर्जनासाठी जाण्याकरिता या कॅप्टन विनायक गोरे उड्डाणपुलाचा वापर करावा लागणार आहे. बरीच गणपतीची मंडळे तसेच घरगुती गणपती आपापल्या मूर्ती घेऊन या पुलावरून जाणार होती. त्यामुळे पुलावरील प्रभाग ७० जवळील सहा दिवे बंद असल्या कारणामुळे नागरिकांना अंधारातूनच रस्ता पार करावा लागणार होता.
मनसैनिक व स्वराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर काळे यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली होती.
यासंदर्भात ‘लोकमत’च्या दि. १८ च्या अंकात वृत्त प्रसिद्ध झाले.
‘लोकमत’च्या वृत्ताचे कात्रण समीर काळे यांनी के पूर्व वॉर्डचे सहायक आयुक्त प्रशांत सकपाळे आणि के पश्चिम वॉर्डचे सहायक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चव्हाण यांना पाठवले. त्यांनी याप्रकरणी तातडीने दखल घेत कॅप्टन विनायक गोरे उड्डाणपुलावरील रस्त्यावरील दिवे तसेच श्रींच्या मिरवणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या रस्त्यावरील झाडांच्या फांद्यांची छाटणी व सर्वांत महत्त्वाचे रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमध्ये महाराष्ट्र सैनिकाच्या मागणीनंतर विसर्जनापूर्वी बारा तासांच्या आत सर्व गोष्टींची पूर्तता करून दिली, अशी माहिती त्यांनी दिली.
‘लोकमत’ने याला वाचा फोडल्याबद्दल आणि या दोन्ही सहायक आयुक्तांनी याची तत्काळ पूर्तता केल्याबद्दल त्यांनी धन्यवाद दिले.