मुंबईः गेल्या दोन वर्षांपासून तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना शुक्रवारी जामीन मंजूर झाल्यानंतर आज त्यांची पोलीस कोठडीतून सुटका झालीय. भुजबळ यांच्या सुटकेची कायदेशीर कागदपत्रं घेऊन पोलीस रुग्णालयात पोहोचले आणि त्यावर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. त्यामुळे आता भुजबळांना रुग्णालयातून पुन्हा तुरुंगात जावं लागणार नाही. परंतु, त्यांना घरी सोडायचं की नाही, याबाबतचा निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतला जाणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून छगन भुजबळ आजारी असून त्यांच्या स्वादुपिंडाच्या विकारावर सध्या केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या स्वादुपिंडाला थोडी सूज असल्यानं त्यांना उपचारांची आणि विश्रांतीचीही गरज आहे. त्यामुळे जामीन मंजूर झाला असला, कोठडीतून सुटका झाली असली, तरी त्यांना लगेच घरी जाता येईल की नाही, याबद्दल आत्ताच सांगता येत नाही. भुजबळ आणि कुटुंबीय याबाबत डॉक्टरांशी चर्चा करून योग्य निर्णय घेणार असल्याचं कळतं.
दरम्यान, दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरण आणि बेहिशेबी मालमत्ता जमवल्याच्या आरोपावरून १४ मार्च २०१६ रोजी छगन भुजबळ यांना अटक करण्यात आली होती. ते दोन वर्षांहून अधिक काळ तुरुंगातच होते. परवाच त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. ५ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली आहे.