अखेर आयुक्तांना गाठावे लागले शरद पवार यांचे घर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 03:11 AM2019-09-28T03:11:32+5:302019-09-28T03:11:56+5:30
संजय बर्वे यांनी घेतली भेट : राज्यभरातील कार्यकर्त्यांची लगबग मुंबईच्या दिशेने वाढू लागल्याने घेतली खबरदारी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात जाण्याची भूमिका घेतल्याने, मुंबईसह राज्यभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, म्हणून रात्रीपासूनच जमावबंदीचे आदेश लागू केले. राज्यभरातील कार्यकर्त्यांची लगबग मुंबईच्या दिशेने वाढू लागल्याने, अखेर पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना शुक्रवारी पवार यांचे घर गाठावे लागले. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्यानंतर, पवारांनी ईडी कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतला आणि पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला.
शरद पवार यांच्या टिष्ट्वटनंतर राष्ट्रवादीचे ठाण्यातील नेते जितेंद्र आव्हाड यांनी पवारांना टॅग करून एक भावनिक टिष्ट्वट केले आहे. त्यात त्यांनी ईडीच्या कार्यालयावर जमू नका, असे पवारांनी दिलेले आदेश माफी मागून अमान्य असल्याचे सांगत, ईडी कार्यालयावर धडकणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार, खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांनी ईडी कार्यालयासह कुलाबा, कफ परेड, मरिन ड्राइव्ह, आझाद मैदान, एमआरए मार्ग, डोंगरी या परिसरात गुरुवारी रात्री १२ वाजल्यापासून शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू केले. शहराच्या पाचही प्रवेशद्वारांसह शहरातील मुख्य ठिकाणे आणि ईडी कार्यालयाच्या परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला, तसेच येथील वाहतूक व्यवस्थेतही बदल केला.
राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात शुक्रवार सकाळी डॉग स्क्वॉडच्या मदतीने तपासणी करण्यात आली, तसेच प्रमुख नेत्यांच्या घराजवळ पोलिसांनी वॉच ठेवला होता. दुपारी १२च्या सुमारास कार्यकर्त्यांची गर्दी वाढल्याने, शहरात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून मुंबईचे कायदा व सुव्यस्थेचे सह आयुक्त विनय चौबे यांनी पवार यांचे घर गाठले. ईडीच्या कार्यालयात जाऊ नये, अशी त्यांना विनंती केली. त्यातूनही काही तोडगा न निघाल्याने दुपारी दीडच्या सुमारास मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी पवार यांची भेट घेतली. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याने, अखेर पावणे दोनच्या सुमारास पवारांनीच ईडी कार्यालयात जाणार नसल्याचे सांगितले.
या प्रकारानंतरही ईडी कार्यालयालगत असलेल्या पक्ष कार्यालगत कार्यकत्यांची गर्दी कायम होती. यात मुंबईत कुणावरही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली नसल्याचेही मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले आहे. ड्रोनच्या माध्यमातून ईडी कार्यालगत असलेल्या परिस्थितीचे चित्रीकरण केले.
‘ईडी’बाहेर तणावपूर्ण वातावरण
शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवार शुक्रवारी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) बॅलार्ड पियर्डच्या कार्यालयाला भेट देणार, म्हणून या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. केवळ प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि पोलीस या व्यतिरिक्त अन्य कोणालाही या परिसरात शिरकाव करण्यास मज्जाव करण्यात आला होता.
शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने समन्स न बजावताही शरद पवार यांनी स्वत:च चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहण्याचा निर्णय घेतला. पवारांच्या या निर्णयामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जमा होऊन अनुचित प्रकार घडण्याची शक्यता वाढल्याने ईडीने खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरात जमावबंदी लागू केली. त्यामुळे सीएसएमटी स्थानकापासूनच कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. शहीद भगतसिंग रोड व पी. डीमेलो रोडवरही पोलीस तैनात करण्यात आले होते.
परिसरावर ड्रोनद्वारे देखरेख!
ड्रोन, मिनी कंट्रोल रूमच्या साहाय्याने हा परिसर सतत पोलिसांच्या देखरेखीखाली होता. पाचपेक्षा अधिक लोकांना या परिसरात जमण्यास मनाई होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी सर्व खबरदारी घेतली होती.