अखेर तक्रारदारांना मिळाले पाचशे रुपयांचे बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 01:29 AM2019-11-14T01:29:44+5:302019-11-14T01:29:49+5:30

‘खड्डे दाखवा पाचशे रुपये मिळवा’ या योजनेनुसार जाहीर करण्यात आलेले बक्षीस तक्रारदारांना देण्यास अखेर पालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे.

Finally, the complainant received a reward of five hundred rupees | अखेर तक्रारदारांना मिळाले पाचशे रुपयांचे बक्षीस

अखेर तक्रारदारांना मिळाले पाचशे रुपयांचे बक्षीस

Next

मुंबई : ‘खड्डे दाखवा पाचशे रुपये मिळवा’ या योजनेनुसार जाहीर करण्यात आलेले बक्षीस तक्रारदारांना देण्यास अखेर पालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. तक्रारीच्या २४ तासांनंतर खड्डा बुजविल्यामुळे तक्रारदारांना संबंधित विभागाकडून पाचशे रुपये देण्यात येत आहे. ही रक्कम देण्यास टाळाटाळ केल्यामुळे पालिका प्रशासनाला टीकेचे धनी व्हावे लागले होते. त्यानंतर, गेल्या दोन दिवसांमध्ये अशा तक्रारदारांशी पालिकेने संपर्क साधला.
पालिका प्रशासनाने खड्डे बुजविण्यासाठी रस्ते विभाग आणि विभागस्तरावरील अधिकाऱ्यांना मुदत दिली होती. ३१ आॅक्टोबर ही मुदत संपल्यानंतर ‘खड्डे दाखवा, पाचशे रुपये मिळवा’ ही योजना १ नोव्हेंबरपासून जाहीर करण्यात आली. या योजनेनुसार पालिकेच्या अ‍ॅपवर तक्रार येताच २४ तासांच्या आत तो खड्डा बुजविण्यात येत होता. असे ९१ टक्के खड्डे मुदतीपूर्वी बुजविल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला. ७ नोव्हेंबर रोजी मुदत संपताच ही मोहीम बंद करण्यात आली. मात्र, २४ तासांनंतर बुजविलेल्या ८५ खड्ड्यांच्या तक्रारदारांना पाचशे रुपये देण्यास पालिकेकडून टाळाटाळ करण्यात येत होती. तक्रारदारांना पैसेही देण्यात येत नसल्याने मुंबईकरांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. मात्र, गेल्या दोन दिवसांत काही तक्रारदारांना विभाग कार्यालयातून संपर्क केला जात आहे. तुमच्या तक्रारीनुसार दिलेल्या मुदतीत खड्डा न बुजविल्यामुळे पाचशे रुपये घेऊन जा अथवा तुमच्या सोयीनुसार कुठे पाठवावे? हे सांगा असे संदेश येऊ लागले आहेत.
>पाचशे रुपयांचे मानकरी
>७ नोव्हेंबरपर्यंत पालिकेने १,६७० खड्डे बुजविल्याचा दावा केला. यापैकी ८५ खड्डे २४ तास उलटून गेल्यानंतर भरण्यात आले.
निसर्ग मेहता यांनी अंधेरी सहार रोडवरील खड्ड्याचे फोटो ५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.४२ वा. पालिकेच्या संकेतस्थळावर टाकले. ६ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.५२ वाजता म्हणजे २४ तास उलटल्यानंतर दहा मिनिटे विलंबाने हा खड्डा भरण्यात आल्यामुळे त्यांना सोमवारी के पूर्व विभागातून फोन आला. त्यानुसार, मेहता यांनी दिलेल्या पत्यावर पाचशे रुपये पालिकेने पाठविले.
बिहारी तलरेजा हे अंधेरी येथील ज्येष्ठ नागरिक असून काही कामानिमित्त ते मालाडला गेले असता त्यांनी काही खड्ड्यांचे फोटो अ‍ॅपवर टाकले. मात्र, त्यांनी तक्रार केलेला खड्डा भरण्यास दोन तासांचा विलंब झाल्यामुळे त्यांना पी उत्तर विभाग कार्यालयातून बुधवारी सकाळी पाचशे रुपयांचे बक्षीस मिळाले.

Web Title: Finally, the complainant received a reward of five hundred rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.