लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार आगामी विधानसभा निवडणूक लढवणार का? कुठून लढवणार? याबाबत सुरू असलेल्या चर्चांना अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी पूर्णविराम दिला. मी पक्षाचा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून हे अधिकृत सांगतो, की अजित पवार हे बारामती मतदारसंघातूनच उमेदवार असतील. मी पक्षाची पहिली जागा जाहीर करतो, असे पटेल यांनी सांगितले.
बारामतीला नवा आमदार मिळेल, असे विधान अजित पवार यांनी बारामतीतच जाहीर केल्यानंतर त्यांच्या उमेदवारीबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या. सध्या अजित पवार विविध मतदारसंघांतून लढण्यासंदर्भात आढावा घेत असून शिरूर मतदारसंघातून लढण्याबाबत ते चाचपणी करत असल्याची चर्चा होती. मात्र, या सर्व चर्चांना पटेल यांनी उमेदवारी जाहीर केल्याने पूर्णविराम मिळाला आहे.
अजित पवार गटाचे अनेक नेते शरद पवारांकडे जात आहेत. रामराजे निंबाळकर शरद पवार गटात जाणार असल्याबाबत विचारले असता पटेल म्हणाले की, त्यांच्या भागात काही स्थानिक विषय आहेत. आम्ही त्यांच्याशी बोलणार आहोत. निवडणुकीच्या काळात काही हालचाली होत असतात. आमच्याकडेही इतर पक्षातून लोक येणार आहेत. हरियाणा विधानसभेचा निकाल आल्यानंतर बाहेर जाणारे आता विचार करतील.
२३० जागांवर एकमत
महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा सकारात्मक सुरू असून आतापर्यंत २३० जागांवर एकमत झाले आहे. उर्वरित जागांवर लवकरच चर्चा पूर्ण होईल. महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत. दसऱ्याच्या आधी महायुतीच्या २३५ च्या आसपास उमेदवारांची यादी जाहीर होईल, असे पटेल यांनी सांगितले.