Join us  

... अखेर ते भाषण हटवलं, जागावाटपाबाबत चंद्रशेखर बावनकुळेंचं नवं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 9:46 AM

मागील वर्षी झालेल्या सत्तांतरात महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं.

मुंबई - राज्यात शिंदे-फडणवीस सरकारचं एकमेकांच्या हातात हात घालून सध्या सुरळीत सुरू आहे. मात्र, विरोधकांकडून शिंदे गटात आलबेल नसल्याचं सातत्याने सांगण्यात येतं. त्यात, आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केलेल्या विधानामुळे महायुतीत मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, बावनकुळे यांनी आपल्या विधानावर सारवासारव केली असून भाजप-शिवसेनेच्या जागावाटपाबाबत कोणतेही सुत्र ठरले नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तर, सोशल मीडियावरुन बावनकुळे यांचा तो व्हिडिओही हटविण्यात आलाय. 

मागील वर्षी झालेल्या सत्तांतरात महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. शिवसेनेच्या पडलेल्या फुटीमुळे मुख्यमंत्रिपदावरून उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावे लागले. इतकेच नाही तर खरी शिवसेना कुणाची हा प्रश्नही उपस्थित झाला. याचे कारण म्हणजे शिवसेनेच्या तब्बल ५५ पैकी ४० आमदारांनी आणि १३ खासदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. शिंदे-ठाकरे संघर्षावर दोन्ही बाजूची कागदपत्रे तपासून निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने कौल देत शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह वापरण्याची परवानगी दिली. 

भाजप आणि शिवसेनेत अनेक मुद्द्यांवरुन मतभेद होते, त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीची वाट धरली. आता, नव्याने स्थापन झालेल्या शिंदेंच्या शिवसेनेसोबतही भाजपचे आलबेल नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, महायुतीच्या जागावाटपांत शिवसेनेला केवळ ५० जागा देण्यात येतील, असे विधान बावनकुळे यांनी केले होते. मात्र, आपल्या विधानाची गंभीरता लक्षात येताच, त्यांनी स्पष्टीकरण देत सारवासारव केलीय. भाजप- शिवसेना (शिंदे गट)  यांचे विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप झाले नसून कोणतेही सूत्र ठरले नसल्याचे स्पष्टीकरण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय.   

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप २४० जागा लढविण्याचा विचार करीत असल्याचे वक्तव्य मी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निवडणूक तयारीच्या दृष्टीने मार्गदर्शन करताना आणि सज्ज रहावे, यासाठी केले होते. निवडणुकीच्या वेळी जागावाटपाचा विचार होईल. शिंदे गटाबरोबर असलेल्या आमदारांच्या जागांपेक्षा ज्या आणखी जागा शिंदे गटाकडे जातील, त्यांना भाजपने केलेल्या निवडणूक तयारीचा उपयोगच होईल, असे बावनकुळे यांनी म्हटल्याचे वृत्त लोकसत्ताने दिले आहे. 

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

२०२४ च्या निवडणुकीत आपल्या जागा शंभर टक्के ज्या काही १५०-१७० येतील. पण आपण २४० जागा लढवण्याच्या विचारात आहोत. कारण शिंदेच्या शिवसेनेकडे ५० जागा आहेत. त्यावरती त्यांच्याकडे कुणी नाही. २४० जागा लढल्या तर अशावेळी तुम्हाला तुमची टीम अलर्ट करावी लागेल. तुम्हाला खूप काम आहे असं विधान बावनकुळेंनी प्रसिद्धी प्रमुखांच्या बैठकीत केले आहे.

भाजपाची सारवासारव  

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा व्हिडिओ चर्चेत आल्यानंतर सर्व सोशल माध्यमातून तो हटवण्यात आला. कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रदेशाध्यक्षांनी असं विधान केल्याचं म्हटलं अशी सारवासारव नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र भाजपाचा हा अंतर्गत कार्यक्रम होता. त्यात माध्यमांना प्रवेश नव्हता. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रदेशाध्यक्षांनी केलेले विधान हे भविष्यात या युतीचं चित्र कसं असू शकते हे स्पष्ट करणारे दिसते.  

टॅग्स :चंद्रशेखर बावनकुळेभाजपाशिवसेनाएकनाथ शिंदे