अखेर 'त्याने' मुंबईत पोहोचवले ५ कोटींचे रेल्वे इंजिन; पोलिसांचा तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 09:49 AM2023-07-12T09:49:09+5:302023-07-12T09:49:23+5:30
करारानुसार तीन टप्प्यांत चार लाख रुपये दिले. उर्वरित २५ हजारांचे काम पूर्ण झाल्यानंतर देण्याचे ठरले. शर्मा यांच्याकडून त्यांच्या मोटार ट्रेलरमध्ये रेल्वे इंजिन मुंबई येथून लोड करून कालका येथे पोहोचविले.
मुंबई : परळ ते कालका येथे इंजिन पोहोचविण्याची जबाबदारी दिलेल्या ट्रान्सपोर्ट कंपनीने पैशांच्या वादातून रेल्वेचे ५ कोटी किमतीचे इंजिन पळविले. अखेर, पोलिसांचा ससेमिरा मागे लागताच अटकेच्या भीतीने कंत्राटदाराने इंजिनाची मुंबईत डिलिव्हरी केली आहे. त्यामुळे हे इंजिन राजस्थानमधून मुंबईत लोड करण्यात आले आहे. या प्रकरणी वडाळा टी टी पोलिस अधिक तपास करत आहेत.
वडाळा ट्रक टर्मिनल येथील रहिवासी असलेले अनिलकुमार गुलाबचंद गुप्ता (४९) यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. ते २०१८ पासून रेल्वे विभागाचे अंतर्गत नोंदणीकृत वाहतूकदार म्हणून काम करतात. २७ एप्रिल रोजी त्यांना रेल्वे विभागाकडून रेल्वे इंजिन लोड करून मुंबई ते कालका येथे सोडण्याबरोबर कालकावरून रेल्वे इंजिन लोड करून मुंबई येथे आणण्याचे काम मिळाले होते. या कामासाठी त्यांनी राधा रोडवेजचे पदाधिकारी पवन शर्मा यांच्यासोबत सव्वाचार लाखांचा करार केला.
करारानुसार तीन टप्प्यांत चार लाख रुपये दिले. उर्वरित २५ हजारांचे काम पूर्ण झाल्यानंतर देण्याचे ठरले. शर्मा यांच्याकडून त्यांच्या मोटार ट्रेलरमध्ये रेल्वे इंजिन मुंबई येथून लोड करून कालका येथे पोहोचविले. २ मे रोजी कालका येथून मुंबईच्या डिलिव्हरीसाठी इंजिन लोड करून घेतले. मात्र, ते वेळेत न पोहोचविल्याने त्यांच्याकडे जाब विचारला. तेव्हा, कामाचे एक लाख रुपये उशिरा दिले म्हणून ६० रुपये अतिरिक्त दिल्यानंतरच डिलिव्हरी देणार असल्याची अट घातली. मात्र, पैसे वेळेत दिले असून उर्वरित २५ हजार डिलिव्हरीनंतर देणार असल्याचे त्यांना सांगताच त्यांनी इंजिन पोहोचविण्यास नकार दिला. अखेर, रेल्वेच्या ५ कोटींच्या इंजिनाचा अपहार केल्याप्रकरणी गुप्ता यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.
अटकेच्या भीतीने...
पोलिसांनी शर्मा यांच्याशी संपर्क साधून इंजिनाबाबत पाठपुरावा सुरू केला. अखेर, अटकेच्या भीतीने त्याने आधी इंजिन मुंबईकडे पाठवले. त्यानुसार, ते मुंबईत लोड झाले आहे. शर्मा यांना देखील समन्स बजाविण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे. इंजिनाची डिलिव्हरी झाल्याने गुप्ता यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.