अखेर धारावी कोरोनामुक्त; जागतिक स्तरावर वाजला होता 'धारावी पॅटर्न'चा डंका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 01:15 AM2022-03-25T01:15:15+5:302022-03-25T01:16:31+5:30
आतापर्यंत धारावीत एकूण ८६५२ बाधित रुग्ण आढळून आले. यापैकी ८२३३ रुग्ण बरे होऊन परतले आहेत.
मुंबई - कोरोना संसर्गावर पूर्णपणे नियंत्रण आणण्यास आशियातील मोठ्या झोपडपट्टीला यश आले आहे. गुरुवारी धारावी परिसरातील शेवटचा सक्रीय रुग्ण देखील बरा झाल्याने आता हा भाग कोरोना मुक्त झाला आहे. विशेष म्हणजे २४ मार्च २०२० रोजी मुंबईत लॉक डाऊन जाहीर झाला होते. यास दोन वर्षे पूर्ण होत असताना धारावीने कोरोनाला हद्दपार केले आहे.
धारावीत डॉ. बलिगा नगर येथे १ एप्रिल २०२० रोजी पहिला कोविड बाधित सापडल्याने खळबळ उडाली होती. दाटीवाटीने वसलेल्या या लोकवस्तीत कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढण्याचा धोका निर्माण झाला होता. यामुळे महापालिकेने वेळीच खबरदारीच्या उपाययोजना आखल्या. याच धारावी पॅटर्नचा पुढे जागतिक स्तरावर डंका वाजला होता.
असे आहे धारावी मॉडेल...
दाटीवाटीची लोकवस्ती असलेल्या या मोठ्या झोपडपट्टीत कोरोचा प्रसार रोखणे हे पालिकेपुढे मोठे आव्हान होते. मात्र जास्तीजास्त लोकांची चाचणी, तत्काळ निदान, त्वरित उपचार, संस्थात्मक विलगीकरण आणि सार्वजनिक शौचालयांचे निर्जंतुकीकरण या उपाययोजना प्रभावी ठरल्या. कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या यशाची जागतिक आरोग्य संघटनेसह जगभरातील विविध संस्था, संघटना व माध्यमांनी दखल घेतली. याच धारावी मॉडेलमधील अनुभवांवर आधारित 'द धारावी मॉडेल' या पुस्तकाचे प्रकाशन सप्टेंबर २०२१ मध्ये करण्यात आले.
असे झाले कोविडमुक्त....
कोविडच्या दुसऱ्या लाटेत धारावीमधील इमारतींमध्ये रुग्ण संख्या वाढली. तसेच तिसऱ्या लाटेतही रुग्ण संख्या प्रचंड वाढली होती. मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यात धारावी मॉडेल यशस्वी ठरले. आतापर्यंत धारावीत एकूण ८६५२ बाधित रुग्ण आढळून आले. यापैकी ८२३३ रुग्ण बरे होऊन परतले आहेत. मागील काही दिवसांपासून एकही बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. तर गुरुवारी सक्रीय रुग्णांची संख्याही शून्यावर आली आहे. आता या भागात कोविडचा एकही रुग्ण नाही.