मुंबईहून विशेष विमान फेऱ्या; दुसरी लाट ओसरताच निर्बंध शिथिल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईकरांचे आवडते आंतरराष्ट्रीय ठिकाण असलेल्या ‘माले’चे द्वार अखेर भारतीय प्रवाशांसाठी खुले झाले आहे. दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव ओसरताच मालदीव प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. ही संधी साधत मुंबई विमानतळाने या मार्गावर विशेष फेऱ्यांचे नियोजन केले आहे.
कोरोनाकाळातही मुंबईकर प्रवाशांनी दुबईपाठोपाठ मालेला सर्वाधिक पसंती दर्शविली. चालू वर्षात जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत तब्बल ५७ हजार ७६५ प्रवाशांनी मुंबईहून मालेला ये-जा केली. मात्र, एप्रिलच्या मध्यावर देशात कोरोनाने पुन्हा रौद्ररूप धारण केल्याने धास्ती घेतलेल्या मालदीव प्रशासनाने भारतीय प्रवाशांवर बंदी घातली. त्यामुळे ऐन उन्हाळी सुटीच्या हंगामात प्रवासी आणि विमान कंपन्यांचा हिरमोड झाला.
जूनअखेरीस भारतातील दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र निर्माण झाल्याने मालदीव प्रशासनाने येथील प्रवाशांवरील निर्बंध शिथिल करण्याबाबत अनुकुलता दर्शविली. ७ जुलैपासून टप्प्याटप्प्याने आशियातील एकेका देशावरील प्रवासनिर्बंध शिथिल करण्यात आले. १५ जुलै रोजी भारतीय प्रवाशांसाठी मालेचे द्वार उघडण्यात आले. त्यामुळे ही संधी साधत मुंबई विमानतळ प्रशासनाने या मार्गावर विशेष फेऱ्यांचे नियोजन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एअर बबल करारांतर्गत मुंबई-माले-मुंबई अशा थेट फेऱ्या वेळापत्रकानुसार उड्डाण घेतील, अशी माहिती मुंबई विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली.
.......
हे नियम पाळावे लागतील...
- मुंबई विमानतळ प्रशासनाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मालेला जाण्याकरिता कोरोना अहवाल अनिवार्य असून, त्याचा वैधता कालावधी ९६ तास ठरविण्यात आला आहे.
- प्रवाशांना प्रवासाच्या २४ तासांआधी आरोग्य घोषणापत्र सादर करावे लागेल. मालदीव प्रशासनाने काही निवडक पर्यटन स्थळांवर १५ जुलैपासून परवानगी दिली आहे, तर निवासी भागांतील पर्यटन स्थळांवर ३० जुलैनंतर परवानगी देण्यात येईल. मालदीवमध्ये प्रवेश केल्यापासून ४८ तासांनंतरच अशा ठिकाणांवर जाता येईल.
......
कोरोनाकाळातील प्रवासी संख्या
- ऑक्टोबर ते डिसेंबर २०२०
४६ हजार ७३५ (३७१ विमाने)
- जानेवारी ते एप्रिल २०२१
५७ हजार ७६५ (विमाने ४९३)