मुंबई : फेब्रुवारी महिन्यात सँडहर्स्ट रोड स्थानकात झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेली द्रविता सिंह तब्बल अडीच महिन्यांनंतर स्वत:च्या पायावर उभी राहिली. ताडदेव येथील खासगी रुग्णालयात उपचार घेणारी द्रविता आता बरी झाली आहे, तिच्या प्रकृतीविषयी माहिती देण्यासाठी शुक्रवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.द्रवितावर तत्काळ केलेल्या उपचारांमुळे आता ती स्वत:च्या पायावर उभी राहू शकते. वॉकरच्या साहाय्याने चालू शकते. लोकल अपघातात द्रविताला उजवा तळपाय आणि डाव्या हाताची बोटे गमवावी लागली होती. पण या सर्व परिस्थितीवर मात करत द्रविताला रुग्णालयातील डॉक्टर आणि सहकाऱ्यांनी मोफत शस्त्रक्रिया करून नवसंजीवनी दिली आहे. याविषयी रुग्णालयाचे प्लॅस्टिक सर्जन डॉ. शैलेश रानडे यांनी सांगितले की, द्रविताने लक्षणीय प्रगती केली आहे. ती एक विशेष फूटवेअर घालून स्वत:च्या पायाने चालली. ती लवकरच तिच्या नेहमीच्या मार्गावरील कल्याण-सीएसएमटी लोकलमधून प्रवास करू लागेल. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात द्रविताने मॅरेथॉनमध्ये धावावे आणि दृढनिश्चय, कठोर मेहनत तसेच प्रामाणिक प्रयत्न केल्यास काहीच अशक्य नसते, हे दाखवून द्यावे, हेच आमचे उद्दिष्ट आहे. तिच्या उपचारांत वॅक शस्त्रक्रियेची खूप मोठी मदत झाली आहे.द्रविताचे उजव्या पायाचे पाऊल वाचवण्यासाठी तिच्यावर सहा शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यात स्किन ग्राफ्टिंग शस्त्रक्रियेचाही समावेश होता. शिवाय, तिच्या डाव्या हाताची करंगळी पूर्णपणे आणि मधल्या बोटाचा तसेच अनामिकेचा काही भाग गमावला आहे. तिने उजव्या पावलाचा अंगठाही गमावला असून तळवा आणि पावलाच्या वरील भागाची त्वचा आणि मऊ ऊतींचेही या अपघातात खूप नुकसान झाले.- नुकतीच पंधरावीची परीक्षा दिलेल्या द्रविताने पुन्हा नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केली. द्रविताने रुग्णालयात उपचार घेताना पराकोटीच्या वेदना आणि नैराश्याचा सामना केला आहे. त्यामुळेच जिद्दीने स्वत:च्या पायावर उभ्या राहिलेल्या द्रविताला आयुष्यातील सर्वच टप्प्यांत सुयश मिळावे, अशा शुभेच्छा भाटिया रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजीव बोधनकर यांनी दिल्या.
अखेर द्रविता स्वत:च्या पायावर उभी राहिली, रेल्वे अपघातात झाली होती जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 1:37 AM