अखेर एन्काउंटर फेम प्रदीप शर्मांनी मनगटावर शिवबंधन बांधले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 07:12 PM2019-09-13T19:12:09+5:302019-09-13T19:13:43+5:30
नालासोपारा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुंबई - एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी खास ओळख असलेले पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी दोन महिन्यांपूर्वी दिलेला राजीनामा राज्याच्या गृह विभागाने मंजूर केला आहे. त्यामुळे प्रदीप शर्मा यांचा राजकारणात जाण्याचा मार्ग जवळपास निश्चित झाला असतानाच त्यांनी आताच मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. नालासोपारा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
प्रदीप शर्मा यांनी ४ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. राजीनाम्यानंतर प्रदीप शर्मा राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. आता राज्याच्या गृह विभागाने राजीनामा मंजूर केल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर प्रदीप शर्मा नालासोपारा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सध्या वसई-विरार भागातील ठाकूर कुटुंबाची असलेली एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी शिवसेनेकडून प्रदीप शर्मा यांना नालासोपारा मतदार संघातून क्षितीज ठाकूर यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येणार आहे. दरम्यान, १९८३ साली पोलीस सेवेत रूजू झालेले प्रदीप शर्मा हे घाटकोपर आणि माहीम ही दोन पोलीस स्टेशन वगळता आपला बहुसंख्य काळ मुंबई गुन्हे शाखा आणि स्पेशल टास्क फोर्समध्येच कार्यरत होते. २००८ मध्ये त्यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर नऊ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर ऑगस्ट २०१७ मध्ये पुन्हा ते पोलीस सेवेत परतले होते. त्यानंतर ठाणे गुन्हे शाखेत कार्यरत होते. पोलीस दलात सर्वाधिक एन्काऊंटर करण्याची कामगिरी प्रदीप शर्मा यांच्याच नावावर नोंद आहे. त्यात मुंबई बॉम्बस्फोटातील 'लष्कर-ए-तोयबा'च्या तीन अतिरेक्यांसह सादिक काल्या, विनोद मटकर, सुहास माकडवाला, रफीक डबा अशा अनेक कुख्यात गुंडांचा समावेश आहे. इतकी उत्तम कामगिरी केलेले प्रदीप शर्मा राजकारण किती गाजवणार याकडे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी अब तक छप्पन चित्रपटातील वन अ पोलीस ऑफिसर ऑलववेज अ पोलीस ऑफिसर हा डायलॉग म्हणत पोलीस खात्याला राम राम ठोकला. शर्मांनी आज सायंकाळी ६ वाजता शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केलं असून उद्धव ठाकरे जी कामगिरी देतील ती पार पाडेन असं म्हटलं आहे. तसेच माझ्या पडत्या काळात शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मला खूप मदत केल्याचं सांगत बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्ही जे एन्काउंटर स्पेशालिस्ट होतो, त्या आम्हा सर्वांना बोलावून आमच्या अडीअडचणी जाणून आमच्या पाठीवर हात फिरवत पाठबळ दिलं. माझ्या उतरत्या काळात मला त्यांनी खूप मदत केली. शिवसेनेला आणि बाळासाहेबांना मी कधीच विसरणार नाही.
तसेच नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु असून तुमच्या विरोधात ठाकूर यांचे आव्हान आहे असा प्रश्न विचारला असता त्यांनी मी दाऊद, छोटा राजन, लष्कर ए तोयबाचे अतिरेकी, बबलू श्री वास्तव यांच्या सारख्या गॅंगस्टर आणि दहशतवाद्यांशी दोन - दोन हात केलेत. त्यामुळे माझ्यासाठी ठाकूर मंडळी यापेक्षा मोठी नाही आहे. मला नालासोपारा मतदार संघातून उमेदवारी दिल्यास मी ती मोहीम फत्ते पाडेन असं ठाकूर यांना थेट आव्हान देखील प्रदीप शर्मा यांनी नाव न घेता दिलं आहे. मी निलंबित असताना मला शिवसेनेचे खासदार एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांनी मदत केली. माझे निलंबन केले त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी धाडसाची धिंड या मथळ्याखाली अग्रलेख लिहला होता. अजूनही माझ्याकडे तो अग्रलेख आहे. ३६ वर्ष पोलीस खात्यात काम केले. आता सोडताना खूप दुःख होत असल्याचे शर्मा यांनी सांगितले.