राज्य परीक्षा परिषदेकडून अधिकृत पत्रक जारी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी इयत्ता पाचवी आणि आठवीची २३ मे रोजी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा अखेर पुढे ढकलण्यात आली आहे.
दरवर्षी फेब्रुवारीत होणारी शिष्यवृत्ती परीक्षा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिलमध्ये घेण्यात येणार होती. मात्र, काेराेना संसर्गामुळे ती २३ मे रोजी आयाेजित करण्याचा निर्णय ३० मार्चला जारी करण्यात आला. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी सुरक्षेेच्या दृष्टीने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा विचार सुरू असल्याची माहिती परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी काही दिवसांपूर्वीच दिली होती. यासंदर्भात लवकरच परिपत्रक जारी करण्यात येईल, असेही स्पष्ट केले हाेते. त्यानुसार, परीक्षा पुढे ढकलण्याचा प्रस्ताव त्यांनी शालेय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिवांकडे पाठविला होता. त्याला मंजुरी मिळाल्याने आता परीक्षा पुढे ढकलल्याचे परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.
दरम्यान, पाचवी तसेच आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्यातून एकूण ६ लाख ३० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेतून पाचवीच्या १६ हजार ६९३ विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत, तर आठवीच्या १६ हजार ५८८ विद्यार्थ्यांना दहावीपर्यंत दर महिन्याला शिष्यवृत्ती देण्यात येते.
...............................................