नेपियन्सी रोडवर अखेर अग्निशमन केंद्रच

By admin | Published: June 20, 2017 05:41 AM2017-06-20T05:41:33+5:302017-06-20T05:41:33+5:30

विकास आराखड्यात दुसऱ्यांदा आरक्षण करूनही वादात अडकलेल्या अग्निशमन केंद्राचे स्वप्न अखेर साकार होणार आहे. प्रियदर्शनी पार्क येथे पहिले

Finally fire fighting center on Napian Road | नेपियन्सी रोडवर अखेर अग्निशमन केंद्रच

नेपियन्सी रोडवर अखेर अग्निशमन केंद्रच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विकास आराखड्यात दुसऱ्यांदा आरक्षण करूनही वादात अडकलेल्या अग्निशमन केंद्राचे स्वप्न अखेर साकार होणार आहे. प्रियदर्शनी पार्क येथे पहिले हरित अग्निशमन केंद्र लवकरच उभारण्यात येणार आहे. नेपियन्सी व वॉर्डन रोड अशा उच्चभ्रू भागांमध्ये सर्वांत उत्तुंग इमारती आहेत. मात्र जवळपास अग्निशमन केंद्र नसल्यामुळे येथील आगीच्या घटना जीवघेण्या ठरत आहेत. त्यामुळे न्यायालयानेच येथे अग्निशमन केंद्राची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
उंच इमारतींमध्ये आगीच्या घटनांची वाढती संख्या हे जगभरातील मोठ्या शहरांपुढे असलेले एक मोठे आव्हान आहे. लक्ष्मीबाई जगमोहनदास मार्ग (नेपीयन-सी रोड) व भुलाभाई देसाई मार्ग (वॉर्डन रोड) परिसरात मोठ्या प्रमाणात उंच इमारती आहेत. याच मार्गाच्या जवळपासच्या परिसरात गेल्या पाच वर्षांमध्ये ४९५ आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नेपियन्सी मार्गावर
असणाऱ्या प्रियदर्शनी पार्कच्या ६५ हजार चौ. मी. परिसरातील सुमारे पाच हजार चौ. मी. जागेवर १९९१च्या विकास आराखड्यामध्ये अग्निशमन केंद्राचे आरक्षण टाकण्यात आले आहे. हेच आरक्षण २०३४च्या प्रारूप विकास नियोजन आराखड्यातही कायम ठेवण्यात आले आहे. मात्र, ६५ हजार चौ. मी. ही जागा ‘मलबार हिल सिटीझन फोरम’ (प्रियदर्शनी पार्क) यांना दत्तक देण्यात आली होती. कालांतराने येथे अग्निशमन केंद्र उभारण्याच्या प्रस्तावाला स्थानिकांनी उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले.
५ जून २०१७ रोजी न्यायालयाने ही याचिका फेटाळली. तरीही
ही याचिका पुन्हा सुनावणीस घेण्यासाठी संबंधितांद्वारे ‘नोटीस आॅफ मोशन’ सादर करण्यात आले होते. परंतु न्यायालयाने आज झालेल्या सुनावणीत अग्निशमन केंद्राची गरज असल्याचे मत व्यक्त करीत पालिकेच्या बाजूने कौल दिला.

‘स्टँडिंग फायर अ‍ॅडव्हायजरी कॉन्सिल’ यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक १०.३६ चौरस किलोमीटरमागे एक अग्निशमन केंद्र असणे आवश्यक आहे.
नेपियन्सी रोडवरील ‘माऊंट ब्लँक’ या इमारतीला लागलेल्या आगीत पाच पुरुष व दोन महिलांसह सात नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर ३० व्यक्ती जखमी झाल्या होत्या. तसेच भुलाभाई देसाई मार्गावरील ‘तिरुपती अपार्टमेंट’ येथे लागलेल्या आगीत मुंबई अग्निशमन दलाने अथक प्रयत्न करून १० पुरुष व १६ महिलांचा जीव वाचविला होता. मुंबईत अग्निशमन दलाची ३४ केंद्रे व १७ छोटी केंद्रे यानुसार एकूण ५१ अग्निशमन केंद्रे आहेत.
याच परिसरामध्ये गेल्या ५ वर्षांत आगीच्या ४९५ घटना नोंदविण्यात आल्या आहेत. त्यामुळे या परिसरासाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्र असणे अत्यंत गरजेचे होते.

Web Title: Finally fire fighting center on Napian Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.