मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने तब्बल ३२ महिन्यांपूर्वी सोडत काढलेल्या मुलूंड गव्हाणपाडा येथील १८२ सदनिकांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. सरासरी २८ लाख ५० हजाराला हे घर पडणार असून त्याशिवाय नोंदणी मुद्रांक शुल्क व देखभाल खर्चाचा अतिरिक्त भुर्दंड सदनिकाधारकांना सोसावा लागणार आहे. ताबा घेण्याबाबत येत्या आठवड्याभरात विजेत्यांना पत्रे पाठविली जातील, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.मुंबई पालिकेचे या घरासाठी ताबा प्रमाणपत्र (ओसी) ३ महिन्यांपूर्वी मिळूनही प्रशासनाकडून दरनिश्चिती करण्यात वेळकाढूपणा करण्यात येत असल्याबाबत ‘लोकमत’ने शुक्रवारी वृत्त दिले होते. त्याची दखल घेत मुंबई मुख्य मंडळांचे कार्यकारी अधिकारी सुभाष लाखे यांनी त्याबाबतच्या प्रलंबित प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.मुंबई मंडळाने २०१५ मध्ये मुुलूंड गव्हाणपाडा येथे अल्प उत्पन्न गट (एलआयजी) १८२ सदनिकांची सोडत काढली होती. २३ मजली टॉवरला जानेवारीमध्ये मुलूंड गव्हाणपाडा येथे म्हाडाकडून मध्यम उत्पन्न व अल्प उत्पन गटासाठी (एमआयजी व एलआयजी) मे २०१५ मध्ये सोडत काढली. अपूर्ण बांधकामे, तसेच आवश्यक अग्निशमन सुरक्षा (उद्वहन), पर्यावरण विभागाची ‘ना हरकत’ (एनओसी) नसल्याने मुंबई पालिकेकेकडून तब्बल अडीच वर्षे ‘ओसी’ मिळाली नव्हती. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर आता अखेर दीड महिन्यानंतर का होईना; दरनिश्चितीला मंजुरी मिळाली आहे.लॉटरीतील फ्लॅटचा ताबा देण्यात विलंब झाल्याने त्याचा भुर्दंड सोडत विजेत्यांना बसला असून घराची किंमत २ लाख ६५ हजार रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे ३३० चौरस फुटांच्या घरासाठी आता सुमारे २८ लाख ५० हजार रुपये मोजावे लागतील. त्याचप्रमाणे वाढलेल्या किमतीमुळे नोंदणीसाठी मुंद्राक शुल्क (स्टॅम्प ड्युटी)मध्ये वाढ होणार आहे. तसेच एक वर्षासाठीचे ‘मेंटनन्स’ शुल्क आगावू स्वरूपात भरावे लागेल.
अखेर ‘त्या’ फ्लॅटच्या दराची निश्चिती, मुलुंड येथील म्हाडाची सोडत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:42 AM