अखेर उड्डाणपूल, स्कायवॉक दुरुस्तीस महापालिकेला मिळाला मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 03:21 AM2019-02-13T03:21:26+5:302019-02-13T03:21:34+5:30
धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट झाल्यानंतरही गेले तीन वर्षे दुरुस्तीचे कागदी घोडे नाचविणाऱ्या महापालिका प्रशासनाला अखेर प्रत्यक्ष कामाचा मुहूर्त मिळाला आहे. मोडकळीस आलेल्या पुलांच्या पुनर्बांधणीचे काम आगामी वर्षात सुरु होणार आहे.
मुंबई : धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट झाल्यानंतरही गेले तीन वर्षे दुरुस्तीचे कागदी घोडे नाचविणाऱ्या महापालिका प्रशासनाला अखेर प्रत्यक्ष कामाचा मुहूर्त मिळाला आहे. मोडकळीस आलेल्या पुलांच्या पुनर्बांधणीचे काम आगामी वर्षात सुरु होणार आहे. उड्डाणपूल, पादचारी पूल, स्कायवॉक, भुयारी मार्ग अशी ५३ दुरुस्तीची कामे होणार आहेत. यासाठी ४२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
सन २०१५ मध्ये महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळण्याची घटना घडली होती. त्यानंतर पालिकेने तत्काळ मुंबईतील पुलांचे आॅडिट करून दुरुस्तीचा निर्णय घेतला. पुढे हा निर्णय कागदावरच राहिला़ गेल्या वर्षी अंधेरी येथील गोखले पूल कोसळल्यानंतर पालिकेला पुन्हा जाग आली. दहिसरमध्ये स्कायवॉकचा भाग कोसळल्यानंतर स्कायवॉकच्या सुरक्षिततेविषयी चिंता व्यक्त होऊ लागली. लोकसंख्या वाढल्यामुळे पुलांचा वापर वाढला आहे़ त्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे पालिकेने या आर्थिक वर्षात दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
या महत्त्वाच्या पुलांची दुरुस्ती....
दादर पश्चिम येथील केशवसुत उड्डाणपूल, टी. एच. कटारिया मार्ग, माटुंगा स्टेशन रोड येथील रेल्वेवरील उड्डाणपूल आणि समांतर पादचारी पूल, माहीम रेल्वेवरील पादचारी पूल, पादचारी भुयारी मार्ग, उड्डाणपूल, सेनापती बापट मागार्ला समांतर पादचारी पूल, माटुंगा स्टेशन, तसेच चेंबूर, गोवंडी, कुर्ला, घाटकोपर, अंधेरी, विलेपार्ले, वांद्रे अशा ५३ पुलांची दुरुस्ती होणार आहे.
२०१० ते २०१३ या काळात मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने सुमारे ३६ स्कायवॉक बांधले आहेत. त्यांच्या देखभालीची जबाबदारी पालिकेवर आहे. दहिसर येथे स्कायवॉकचा भाग कोसळण्याच्या घटनेनंतर सर्व स्कायवॉकचे आॅडिट करण्यात आले.
यामध्ये धोकादायक आढळलेल्या स्कायवॉकची दुरुस्ती करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात चेंबूर, वांद्रे, अंधेरी, विलेपार्ले येथील स्कायवॉकची दुरुस्ती केली जाईल.
महापालिकेच्या अखत्यारीतील ३४४ पूल आहेत. यापैकी १४ पूल पाडून त्यांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. यासाठी १३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
मोठी दुरुस्ती आवश्यक असलेले ४७ पूल असून त्यांच्या दुरुस्तीसाठी ६१ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. छोट्या दुरुस्तीची आवश्यकता असलेले १७६ पूल आहेत. त्यांच्या दुरुस्तीवर २०२ कोटी खर्च होणार आहेत.