Join us

अखेर गजदरबंद पम्पिंग स्टेशन झाले सुरू, पाच वर्षांनंतर प्रतीक्षा संपली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 3:14 AM

तीनवेळा मुदतवाढ दिल्यानंतरही काम अर्धवट सोडणाऱ्या ठेकेदाराला काढून महापालिकेने नवीन ठेकेदाराला नेमले.

मुंबई : तीनवेळा मुदतवाढ दिल्यानंतरही काम अर्धवट सोडणाऱ्या ठेकेदाराला काढून महापालिकेने नवीन ठेकेदाराला नेमले. युद्धपातळीवर उर्वरित कामे करण्यात आली. अखेर पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गजदरबंद पम्पिंग स्टेशन आजपासून कार्यान्वित झाले आहे. यामुळे यंदाच्या पावसाळ्यात खार, विलेपार्ले, जुहू या परिसरातील रहिवाशांना पुराच्या पाण्यापासून दिलासा मिळणार आहे. मात्र या विलंबामुळे या प्रकल्पाचा खर्च तब्बल १४० कोटींवर पोहोचला.२६ जुलै २००५ मध्ये मुंबईत निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीनंतर ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत मुंबईत आठ ठिकाणी पम्पिंग स्टेशन बांधण्याचा निर्णय झाला. मात्र यापैकीच एक असलेल्या गजदरबंद पम्पिंग स्टेशनचे काम रखडले. २०१४ मध्ये या पम्पिंग स्टेशनचे काम सुरू झाले. तीनवेळा मुदतवाढ देऊनही या पम्पिंग स्टेशनचे काम पूर्ण करण्यात येत नसल्याने संबंधित ठेकेदाराचे कंत्राट अखेर रद्द करण्यात आले.नवीन ठेकेदाराने दिलेल्या मुदतीत काम पूर्ण केल्याने आजपासून हे पम्पिंग स्टेशन सुरू करण्यात आले आहे. ग्रीन स्ट्रीट नाला, सारस्वत कॉलनी येथील मीरा बाग, हिंदू स्मशानभूमीजवळील दत्तात्रय रोड आणि मुक्तानंद पार्क अशा सखल भागांमध्ये असे एकूण सहा पंप लावून पाण्याचा उपसा करण्यात येणार आहे. प्रत्येक पंपाद्वारे दर तासाला अडीचशे क्युबिक मीटर पाण्याचा उपसा होणार आहे. गजदरबंद पम्पिंग स्टेशनमुळे खार, सांताक्रुझ, जुहू, अंधेरी येथे साठणाºया पावसाच्या पाण्याचा निचरा जलदगतीने होऊ शकेल. या पम्पिंग स्टेशनमधील पंप प्रति सेकंद ३६ हजार लीटर पाणी बाहेर फेकू शकणार आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.१४० कोटी रुपये खर्च२०१४ मध्ये या पम्पिंग स्टेशनचे काम महापालिकेने सुरू केले आहे. विलंबामुळे या प्रकल्पाचा खर्च १४० कोटींवर पोहोचला.या पम्पिंग स्टेशनमध्ये बसविण्यात येणारे पंप कोरियामधून मागविण्यात आले आहेत. हे पम्पिंग स्टेशन वेळेत उभा करून त्याची पुढची सात वर्षे देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर असणार आहे.

टॅग्स :मुंबई