अखेर दहावी परीक्षा रद्दचा शासन निर्णय जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:06 AM2021-05-13T04:06:43+5:302021-05-13T04:06:43+5:30
विद्यार्थ्यांना दिलासा; आता लक्ष अकरावी प्रवेशासंदर्भातील निर्णयाकडे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाच्या घोषणेनंतर तब्बल ...
विद्यार्थ्यांना दिलासा; आता लक्ष अकरावी प्रवेशासंदर्भातील निर्णयाकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाच्या घोषणेनंतर तब्बल २३ दिवसांनी याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. आतापर्यंत केवळ तोंडी घोषित करण्यात आलेल्या या निर्णयामुळे कागदोपत्री दहावीची परीक्षा रद्द झालीच नव्हती. मात्र, बुधवारी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयामुळे विद्यार्थी, पालकांना दिलासा मिळाला आहे.
दहावी रद्दच्या जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, परीक्षा रद्द केल्यामुळे दहावीचे गुणपत्रक, प्रमाणपत्र देण्याबाबत, तसेच अकरावीची प्रवेश प्रक्रिया कशी होणार याबाबत स्वतंत्र परिपत्रक जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, अकरावीची स्वतंत्र प्रवेश परीक्षा घ्यावी का, याबाबत विद्यार्थ्यांची, तर अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करावा का, याबाबत मुख्याध्यापकांची मते शिक्षण विभागाने सर्वेक्षण करून घेतली आहेत. या सर्वेक्षणाची मुदत संपली असून, त्याचा अहवाल आता शिक्षण विभाग आणि राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यापुढे सादर करण्यात येईल. त्यानुसार दहावीचे अंतर्गत मूल्यमापन आणि अकरावीची स्वतंत्र प्रवेश परीक्षा याचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
* २० टक्के मतांच्या आधारावर निर्णय घेणार का?
अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात राज्यातील ३ लाख ११ हजार विद्यार्थ्यांनीच आपली मते नोंदविली. त्यातही राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांची संख्या केवळ २ लाख ८७ हजार ३४८ इतकी आहे. राज्यभरातून यंदा जवळपास १६ लाख विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेली असताना केवळ २० टक्के विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणावरून अकरावी प्रवेशाचा निर्णय घेणार का, असा प्रश्न तज्ज्ञ उपस्थित करीत आहेत. अनेक विद्यार्थ्यांपर्यंत हे सर्वेक्षण पोहोचलेलेच नसताना यावरून शिक्षण विभाग अंतिम निर्णय कसा घेणार, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.