अखेर पालिका अभियंत्यांच्या बढतीला हिरवा कंदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:09 AM2021-08-21T04:09:48+5:302021-08-21T04:09:48+5:30
मुंबई - महापालिकेतील तब्बल १३२ अभियंत्यांच्या बढतीचा प्रस्ताव गेले अडीच वर्षे रेंगाळला होता. स्थापत्य समितीमध्ये (शहर) अभियंत्यांच्या बढतीचा प्रस्ताव ...
मुंबई - महापालिकेतील तब्बल १३२ अभियंत्यांच्या बढतीचा प्रस्ताव गेले अडीच वर्षे रेंगाळला होता. स्थापत्य समितीमध्ये (शहर) अभियंत्यांच्या बढतीचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर पालिकेच्या महासभेपुढे तातडीचे कामकाज म्हणून मांडण्यात आला. तीन ते चार महासभेनंतरही त्यावर निर्णय न झाल्यामुळे अभियंत्यांमध्ये नाराजी पसरली होती. हा मुद्दा विरोधी पक्षांनी उचलून धरल्यामुळे शिवसेनेची कोंडी झाली. अखेर या बढतीच्या प्रस्तावाला शुक्रवारी महासभेने मंजुरी दिली.
पालिकेच्या १०५ सहायक अभियंत्यांना कार्यकारी अभियंता पदावर तर २६ कार्यकारी अभियंत्यांना उपप्रमुख अभियंतापदी बढती देण्याचा प्रस्ताव महासभेत मांडण्यात आला होता. महिन्याभराहून अधिक काळ हा प्रस्ताव महासभेपुढे रेंगाळला होता. भाजप आणि काँग्रेस पक्षानेही शिवसेनेच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात होता. अभियंत्यांच्या बढतीच्या प्रस्तावावर तत्काळ निर्णय घेतला जात असे. प्रस्ताव मंजूर करण्यास दिरंगाई होत असल्याने पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेले अनेक अभियंता निवृत्तीच्या मार्गावर आहेत.
याबाबत म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुखदेव काशिद यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेऊन अभियंत्यांची व्यथा मांडली होती. आगामी निवडणुकीत अभियंत्याच्या बढतीचा रखडलेला प्रस्तावही गाजण्याची शक्यता निर्माण झाली होती. यामुळे शिवसेनाच अडचणीत येणार असल्याने अखेर महापौरांनी शुक्रवारी झालेल्या पालिकेच्या महासभेत या प्रस्तावाला अखेर मंजुरी दिली आहे.