अखेर मानखुर्दमध्ये बसला कोरोनाला अटकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 01:30 AM2020-07-29T01:30:51+5:302020-07-29T01:31:02+5:30

तब्बल १६ लाख लोकांची झाली तपासणी : कार्यकर्ते आणि शिक्षकांचा योग्य समन्वय

Finally, he stopped at Corona in Mankhurd | अखेर मानखुर्दमध्ये बसला कोरोनाला अटकाव

अखेर मानखुर्दमध्ये बसला कोरोनाला अटकाव

Next

गौरीशंकर घाळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील चळवळ्या कार्यकर्त्यांचा खुबीने सदुपयोग करत मानखुर्द शिवाजीनगर भागातील कोरोनाला अटकाव करण्यात पालिका प्रशासनाला यश आले आहे. एप्रिल महिन्यात कोरोना प्रभावित विभागांच्या यादीत पहिल्या तीनमध्ये असलेला हा विभाग आता १७व्या स्थानापर्यंत खाली घसरला आहे.
धारावीनंतर मुंबईतील मोठी झोपडपट्टी म्हणजे मानखुर्द-शिवाजीनगर. बैंगनवाडी, कमलारमन नगर, लोट्स कॉलनी, लिंबोणी बाग, अयोध्यानगर, या दाट लोकवस्तीचा पट्टा कोरोना संक्रमणासाठी अनुकूल होता. त्यामुळे या पट्ट्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर होते. मात्र, प्रतिबंधित क्षेत्रात नेमलेले कार्यकर्र्ते आणि पालिका कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून कोरोनाविरोधातील उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात यश मिळाले आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी येथील प्रभावी कामाचे कौतुक केले आहे.
पालिकच्या एम-पूर्व वॉर्डातील या परिसराची लोकसंख्या सुमारे ११ लाख आहे. साधारण ३३ चौरस किलोमीटरचा परिसर या वॉर्डात येतो. एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळून येत होते. मात्र, वरळी आणि धारावीप्रमाणे या भागाची चर्चा झाली नाही. तरीही एकूण समाजजीवन आणि दाट लोकवस्तीमुळे पालिकेसह राज्य सरकारसमोरही येथील कोरोना संसर्ग रोखण्याचे मोठे आवाहन होते. आतापर्यंत या भागात ३९७८ कोरोना रुग्ण आढळून आले असून, २८९ लोक कोरोनामुळे दगावले आहेत. बरे होणाऱ्यांची संख्या ३०८१ असून १२८ अ‍ॅक्टिव रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

कार्यकर्ते बनले पालिकेचे कान-डोळे
सुरुवातीच्या टप्प्यात या परिसरात ६२ प्रतिबंधित क्षेत्र होती. दाट लोकवस्तीमुळे पालिकेचे कर्मचारीही अनेकदा या भागात जाण्यास अनुत्सुक असायचे. यावर स्थानिक उत्साही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मात करण्यात आली. प्रत्येक प्रतिबंधित क्षेत्रात एक याप्रमाणे स्थानिक उत्साही कार्यकर्त्यांची रचना उभारण्यात आली. या ६२ कार्यकर्त्यांशी नियमित संपर्काची जबाबदारी वॉर्डातील कंट्रोल रूममधील सहा शिक्षकांवर सोपविण्यात आली. दिवसातून तीन-चार वेळा मोबाइलवर संपर्क करायचा. येथील सार्वजनिक शौचालयात दर दोन तासांनी निर्जंतुकीकरण होत आहे का, कचरा उचलला जात आहे का, कोणाला खोकला-ताप अशी लक्षणे आढळतायत का, अशी प्राथमिक माहिती या कार्यकर्त्यांकडून नियमितपणे जमा करण्यात आली. यात कुठे कमतरता आढळली तर तातडीने पालिकेचे अधिकारी संबंधित विभागाच्या कर्मचाºयांना कामाला लावत. त्यामुळे नियमित स्वच्छता आणि संशयित रुग्णांचा शोध घेणे सोपे झाले. १६ लाख ४३ हजार लोकांची झाली तपासणी
आतापर्यंत या भागात १६ लाख ४३ हजार लोकांची तपासणी करण्यात आली. काही ठिकाणी दोन-तीन वेळा तपासणी करण्यात आल्याचे एम-पूर्वचे सहायक आयुक्त सुधांशु द्विवेदी यांनी सांगितले. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी साधारण ८० फिवर कॅम्प घेण्यात आले आहेत. कोरोनावाढीचा दर ०.८ टक्के इतका खाली आला असून, रुग्ण दुपटीचा कालावधी ८५ दिवसांवर गेला आहे. मागील दहा दिवसात कोरोनामुळे होणारे मृत्यूही अपवादात्मक बनल्याचे द्विवेदी यांनी सांगितले.

इमारतींच्या दिशेने सरकतोय कोरोना
विभागातील झोपडपट्टी परिसरात कोरोना संसर्ग रोखण्यात यंत्रणा पुरेसे यश आले आहे. मात्र, अलीकडच्या
काळात इमारतींमध्ये ज्याला आपण व्हर्टिकल स्लम म्हणतो तिकडे कोरोनाचे रूग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे अशा भागावर आता लक्ष्य केंद्रीत करण्यात आले आहे. कोणत्याही स्थितीत यंत्रणेत ढिलाई येणार नाही
याची खबरदारी घेतली जात
आहे.
- सुधांशू द्विवेदी,
एम-पूर्वचे सहाय्यक आयुक्त

Web Title: Finally, he stopped at Corona in Mankhurd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.