Join us

अखेर न्यायासाठी लढणाऱ्या ‘त्या’ वीरपत्नीला दिलासा

By admin | Published: April 18, 2017 6:05 AM

गेली २७ वर्षे उदरनिर्वाहासाठी सेवा निवृत्तिवेतनाच्या प्रतीक्षेत असलेल्या दुसऱ्या महायुद्धातील वीरपत्नीला दरमहा तीन हजार रुपये निवृत्तिवेतन देण्याची तयारी

मुंबई : गेली २७ वर्षे उदरनिर्वाहासाठी सेवा निवृत्तिवेतनाच्या प्रतीक्षेत असलेल्या दुसऱ्या महायुद्धातील वीरपत्नीला दरमहा तीन हजार रुपये निवृत्तिवेतन देण्याची तयारी राज्य सरकारने दाखवली आहे. उच्च न्यायालयाने जिल्हा सैनिक कल्याण बोर्डाला एका आठवड्यात सामान्य प्रशासन विभागाकडे प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश देत त्यापुढील एका आठवड्यात अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश सरकारला दिले. या दोन आठवड्यातच वीरपत्नीच्या खात्यात पेन्शन जमा करण्याचेही निर्देशही न्यायालयाने दिले. महाराष्ट्र व कर्नाकट सरकारने एकमेकांवर जबाबदारी ढकलल्याने गेली २६ वर्षे ८४ वर्षीय तुळसाबाई सूर्यवंशी सेवा निवृत्तिवेतनाला मुकल्या होत्या. त्यांनी यासंदर्भात अ‍ॅड. धैर्यशील सुतार यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गेल्या सुनावणीत खंडपीठाने राज्य सरकारला या प्रकरणात विलंब न करता एका आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सोमवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करत तुळसाबाई निवृत्तिवेतनाचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्याचे सांगितले. मात्र, कोल्हापूरच्या जिल्हा सैनिक कल्याण बोर्डाने आवश्यक ती कागदपत्रे सामान्य प्रशासन विभागाला पाठवल्यानंतरच सामान्य प्रशासन विभाग अंतिम निर्णय घेईल, अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली.कागदपत्रांचे संकलन करून राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण करण्यासाठी एका आठवड्याची मुदत द्यावी, अशी विनंती जिल्हा सैनिक कल्याण बोर्डाने केली. तर सामान्य प्रशासन विभागाने कागदपत्रांची छाननी करून अंतिम निर्णय घेण्यासाठी एका आठवड्याची मुदत मागितली. त्यावर खंडपीठाने सरकारला दोन आठवड्यांत अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश दिले. ‘अशा प्रकरणांत जलदगतीने निर्णय घेणे आवश्यक आहे आणि राज्य सरकारने चांगली पावले उचलली आहेत,’ असेही खंडपीठाने म्हटले. (प्रतिनिधी)