Join us

...अखेर वाघांची संख्या कमी होण्यास रानकुत्रे जबाबदार नसल्याचे झाले मान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पूर्व विदर्भातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान आणि नागझिरा अभयारण्यात कार्यरत असताना रानकुत्र्यांबाबत अभ्यास करून शासनास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पूर्व विदर्भातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान आणि नागझिरा अभयारण्यात कार्यरत असताना रानकुत्र्यांबाबत अभ्यास करून शासनास सादर केलेल्या अहवालामुळे येथील रानकुत्र्यांचे प्राण वाचले, असे अरण्यऋषी मारूती चितमपल्ली यांनी सांगितले. वाघांची संख्या कमी होण्यास रानकुत्रे जबाबदार नसल्याचे मान्य झाले. ‘महाराष्ट्राच्या रानवाटा’ या विषयावर महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे रौप्य पुष्प गुंफताना चितमपल्ली बोलत होते.

पूर्व विदर्भातील वाघांची संख्या कमी होण्यास रानकुत्रेच जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढून रानकुत्र्यांना मारण्याचे फर्मान देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पक्षीतज्ज्ञ सलीम अली यांच्यासोबत झालेल्या भेटीत त्यांनी रानकुत्र्यांचा साक्षेपी अभ्यास करून शासनाचे फर्मान थांबविण्याच्या सूचना दिल्याचा संदर्भही चितमपल्ली यांनी यावेळी दिल्या. यासाठी २४ तास रानात पहारा देऊन रानकुत्र्यांच्या खाण्याच्या पद्धतीचा अभ्यास केला. त्याबाबत निरीक्षणे नोंदवली. यासंदर्भात शासनास सविस्तर अहवाल सादर केला. अखेर वाघांची संख्या कमी होण्यास रानकुत्रे जबाबदार नसल्याचे मान्य झाले व त्यांचे प्राण वाचले. हा आपल्या आयुष्यातील आनंदाचा क्षण ठरला.

१९५८-६० मध्ये तामिळनाडूतील कोईम्बतूर शहरात वनाधिकारी पदवी शिक्षण घेताना, महाविद्यालयाच्या प्रथेनुसार अनाईमलाई पर्वतावर स्थित वन अभ्यासक हुड यांच्या समाधीचे दर्शन व त्याचा किस्सा चितमपल्ली यांनी सांगितला. हुड यांनी अनाईमलाई पर्वतावरील हजारो एकरावर फुलवलेली हिरवाई व त्यांची वनांप्रती असलेली निष्ठा बघून थक्क झालो. येथून वनांचा विकास आणि तेथील प्राण्यांचे संवर्धन त्यांचा वैविध्यपूर्ण अभ्यास हे जीवन ध्येय ठरल्याचे चितमपल्ली यांनी सांगितले.

.........................