अखेर कृपाशंकर सिंग भाजपमध्ये दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:06 AM2021-07-08T04:06:25+5:302021-07-08T04:06:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : माजी राज्यमंत्री आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : माजी राज्यमंत्री आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह उत्तर प्रदेशातील बड्या नेत्यांच्या उपस्थितीत कृपाशंकर सिंग यांच्या भाजप प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
एकेकाळी मुंबई काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांमध्ये गणले जाणारे कृपाशंकर सिंग काही वर्षांपासून बाजूला फेकले गेले होते. तशातच २०१९ साली त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविण्याच्या निर्णयाला पाठिंबा देत काँग्रेसच्या अधिकृत भूमिकेला त्यांनी विरोध केला होता. राज्यात फडणवीस सरकार असताना त्यांच्या भाजप प्रवेशाच्या, तर ठाकरे सरकारच्या काळात त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा रंगत होत्या. दरम्यानच्या काळात ‘परिश्रम’ या संस्थेच्या माध्यमातून कृपाशंकर सिंग यांनी मुंबई महानगर क्षेत्रातील उत्तर भारतीय नागरिकांशी संबंधित संस्था, संघटना, नेत्यांशी संपर्क अभियान चालविले होते. उत्तर भारतीय मतदारांमध्ये आजही त्यांचा दांडगा जनसंपर्क असल्याने त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत तर्क लढविले जात होते. अखेर, आज भाजप प्रवेश करून त्यांनी आपली पुढील राजकीय दिशा स्पष्ट केली.
देवेंद्र फडणवीस यांनी कृपाशंकर सिंग यांचे भाजपमध्ये स्वागत करत त्यांचा प्रवेश हा पक्षातील नसून एका विचारधारेतून दुसऱ्या विचारधारेत झालेला प्रवेश असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस सोडल्यानंतर कृपाशंकर लगेच भाजपत सामील झाले नाहीत. त्यांनी २०-२१ महिने काश्मीर प्रश्नावर काम केले आणि दोन वर्षांनी ते भाजपत सामील झाल्याचेही फडणवीस यांनी नमूद केले.
कृपाशंकर यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसला कोणताच धक्का बसला नसल्याचे मुंबई काँग्रेस कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी म्हटले आहे. दोन वर्षांपूर्वीच त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. मधल्या काळात उत्तर भारतीय समाजातील अनेक तरुण नेते, कार्यकर्ते काँग्रेसमध्ये सामील झाले असल्याचेही सप्रा म्हणाले.