Join us

लोकमतचा दणका ! अखेर कुर्ला पादचारी पुलाचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 2:00 AM

२ नोव्हेंबर रोजी याच ठिकाणी दोन अनोळखी तरुणांचा अपघाती मृत्यू झाला.

मुंबई : कुर्ला येथील स्वदेशी मिल रोड ते सर्वेश्वर मंदिर रोड यांना जोडणाऱ्या रेल्वे रुळावरील पादचारी पुलाचे काम मागील दीड वर्षापासून रखडले होते. या रखडलेल्या कामामुळे चार जणांचा अपघाती मृत्यू झाला. ‘लोकमत’ने यासंबंधीचे वृत्त प्रकाशित करताच खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.

२ नोव्हेंबर रोजी याच ठिकाणी दोन अनोळखी तरुणांचा अपघाती मृत्यू झाला. तर, मागील वर्षी रेल्वे रूळ ओलांडताना स्थानिक रहिवासी विनीत माने, रुपेश साळुंखे या दोन तरुणांचा मृत्यू झाला. रखडलेल्या पादचारी पुलाच्या कामामुळे अनेकांचे जीव जात असल्याने स्थानिक रहिवाशांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. स्थानिक रहिवाशांच्या पुढाकाराने या पादचारी पुलाचे काम अखेर सुरू झाले. कंत्राटदाराला पादचारी पुलाचे पुनर्बांधणी करण्याची मुदत दिली होती. मात्र त्या मुदतीत काम पूर्ण झाले नाही. त्यानंतर पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. दीड वर्ष उलटूनदेखील पुलाचे काम झाले नाही. याचा फटका स्थानिक रहिवाशांना बसत होता. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी, रुग्णालय, बाजारपेठेत जाण्यासाठी पूल ओलांडून कुर्ला पश्चिमेकडे जावे लागत होते.कुर्ला येथील पादचारी पुलाचे काम करण्यासाठी कर्मचारी आले होते. त्यांनी येथे आखणी केली आहे. रहिवाशांनी सहकार्य करावे.- विनायक शिंदे, उपाध्यक्ष, रेल यात्री परिषद

टॅग्स :मुंबई