अखेर विधि सीईटीची मुदत ३१ आॅगस्टपर्यंत वाढविली, सीईटी आयुक्तांची उच्च न्यायालयाला माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 01:25 AM2017-08-23T01:25:10+5:302017-08-23T01:25:36+5:30
विधि अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणा-या मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्याच्या सीईटी सेलने अर्ज भरण्याकरिता अखेर ३१ आॅगस्टपर्यंत मुदत वाढवून दिली आहे
मुंबई : विधि अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणा-या मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्याच्या सीईटी सेलने अर्ज भरण्याकरिता अखेर ३१ आॅगस्टपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. मात्र त्यानंतर मुदत वाढवून देणे अशक्य आहे, असेही सीईटी आयुक्तांनी उच्च न्यायालयाला मंगळवारच्या सुनावणीत सांगितले.
पदवी अभ्यासक्रमाचा निकाल केव्हा जाहीर केला जाणार, याबाबत मुंबई विद्यापीठाने काहीही माहिती न दिल्याने विद्यार्थ्यांकरिता विधी अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी ३१ आॅगस्टपर्यंत मुदत वाढवून देत आहोत. मात्र त्यानंतर ही मुदत वाढवणे अशक्य आहे, असे सीईटी आयुक्तांतर्फे अॅड. एस. पटवर्धन यांनी न्या. अनुप मोहता व न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठाला सांगितले.
विधि अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी फॉर्म भरण्याची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना ५ आॅगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र मुंबई विद्यापीठाने निकाल जाहीर न केल्याने ही मुदत १८ आॅगस्ट त्यानंतर २४ आॅगस्ट आणि आता ३१ आॅगस्टपर्यंत वाढविण्यात आली. सीईटी विभागाने दिलेल्या या मुदतवाढीमुळे मुंबई विद्यापीठाच्या हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सीईटी आयुक्तांनी दिलेल्या या आश्वासनाच्या आधारे मुंबई विद्यापीठाचे वकील रुई रोड्रीग्स यांनी बी.ए., बी. कॉम आणि बी.एस्सी.चे निकाल जाहीर करण्यासाठी आणखी किती दिवस लागणार आहेत, याबाबत आपल्याला विद्यापीठाकडून सूचना घेण्याची आवश्यकता असल्याचे न्यायालयाला सांगितले.
बी.ए., बी.कॉम. व बी.एस्सी.चे निकाल ३१ आॅगस्टपूर्वी लागले पाहिजेत. मात्र याबाबत आपण विद्यापीठाकडूनच सूचना घेऊ, असे रोड्रीग्स यांनी न्यायालयाला सांगितले. त्याशिवाय एलएलबी व एलएलएमच्या अंतिम वर्षाचे निकाल कधी लागतील, याचीही माहिती घेण्याचे आश्वासन न्यायालयाला दिले. या समस्येचे निवारण करण्यासाठी विद्यापीठ युद्धपातळीवर काम करीत आहे, असे रोड्रीग्स यांनी सांगितले. तरी सर्व पदवी अभ्यासक्रमांचे निकाल केव्हा लागणार, याचे उत्तर रोड्रीग्स देऊ शकले नाहीत. आतापर्यंत आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्समधल्या सुमारे १४ हजार विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासून झाल्या आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका लवकरच तपासण्यात येतील. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासण्याची पद्धत चांगल्या हेतूने सुरू केली. मात्र काही तांत्रिक कारणास्तव गोंधळ उडाला. हा गोंधळही आता दूर करण्यात
आला आहे.
विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमाचा निकाल लावण्यास विलंब केल्याने अनेक विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयाचे दाद ठोठावले. विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळ केला, असे म्हणत विद्यापीठाने याचिकाकर्त्यांना प्रत्येकी १० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
उत्तरपत्रिका तपासून व्हाव्यात यासाठी प्राध्यापकांच्या रजाही रद्द करण्यात आल्या आहेत, असे रोड्रीग्स यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालयाने २४ आॅगस्ट रोजी किती उत्तरपत्रिका तपासून झाल्या आणि किती राहिल्या आहेत, याची संपूर्ण माहिती सादर करण्याचे निर्देश विद्यापीठाला दिले.