अखेर बिबट्या पुन्हा जंगलात
By admin | Published: May 25, 2014 05:36 AM2014-05-25T05:36:01+5:302014-05-25T05:36:01+5:30
येथील वागळे इस्टेट परिसरातील वारलीपाडा या आदिवासी भागातील कृष्ण गजानन लोहारकर यांच्या घरात शुक्र वारी रात्री १०.३० च्या सुमारास अचानक बिबट्या शिरला
ठाणे : येथील वागळे इस्टेट परिसरातील वारलीपाडा या आदिवासी भागातील कृष्ण गजानन लोहारकर यांच्या घरात शुक्र वारी रात्री १०.३० च्या सुमारास अचानक बिबट्या शिरला. त्यांच्या पत्नीच्या लक्षात आल्याने त्यांनी मुलासह पतीस घराबाहेर काढून बिबट्याला आत कोंडले. ही बातमी वार्यासारखी पसरल्यावर शहरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. तसेच वन विभागानेही वेळीच घटनास्थळी धाव घेऊन घरात बंदिस्त झालेल्या बिबट्याला कोणतीही इजा होऊ नये आणि त्याला सुरक्षित जंगलात जाण्यासाठी आपले आॅपरेशन सुरू केले. हे आॅपरेशन पहाटे ३.३० वाजता संपले. शर्थीच्या प्रयत्नानंतर बिबट्या हाती लागत नसल्याने अखेर झोपडीच्या मागच्या बाजूला भगदाड पाडल्यावर बिबट्या जंगलात पळून गेला. मात्र, यामध्ये लोहारकर कु टुंबीयांच्या घराचे नुकसान झाले आहे. या परिसरात बिबट्या वारंवार दिसत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. ठाण्याच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेलगत असलेल्या वारलीपाडा परिसरात सुमारे ४ ते ५वर्षीय हा बिबट्या कोंबड्या पकडण्यासाठी म्हणून शिरला असावा. बिबट्या शिरल्याचे पाहून गावकर्यांनी त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला. या गोंधळात बावचळल्याने तो लोहारकर यांच्या उघड्या झोपडीत शिरला. झोपडीतील लोहारकर कुटुंब सुखरूप बाहेर पडल्यानंतर दार लावून बिबट्याला आत कोंडण्यात आले. ठामपा अग्निशमन दल आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बचाव पथकाने (येऊर आणि बोरीवली) त्वरित घटनास्थळी धाव घेतली. या वेळी बचाव पथकाला आपले काम करणे अवघड होत होते. त्यातच बिबट्या हा पलंगाखाली गेल्याने त्याला बेशुद्ध करण्यासाठीही अडचणीचा सामना करावा लागत होता. जवळपास ६ तास प्रयत्न करूनही त्यात यश येत नव्हते. शेवटी, वन विभागाच्या अधिकार्यांनी त्या झोपडीच्या मागच्या बाजूला भगदाड पाडले आणि पहाटे साडेतीनच्या सुमारास झाडाझुडुपांचा आधार घेत तो पुन्हा जंगलात पळाल्याची माहिती परिक्षेत्र वनअधिकारी (येऊर) सुशांत साळगावकर यांनी दिली. (प्रतिनिधी )