अखेर हँकॉक पुलाच्या कामाला सोमवारचा मुहूर्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 02:28 AM2018-07-21T02:28:54+5:302018-07-21T02:31:07+5:30
गेल्या अडीच वर्षांपासून अनेक कारणांमुळे रखडलेल्या माझगाव येथील हँकॉक पुलाच्या पुनर्बांधणीला सोमवारी सुरुवात होणार आहे.
मुंबई : गेल्या अडीच वर्षांपासून अनेक कारणांमुळे रखडलेल्या माझगाव येथील हँकॉक पुलाच्या पुनर्बांधणीला सोमवारी सुरुवात होणार आहे. मात्र, रेल्वेच्या रुळाखालून जाणारी १,२०० मिमी जलवाहिनी व अनधिकृत झोपड्यांचा या कामात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. येथील झोपड्यांच्या पुनर्वसनाचे काम रेल्वेने महापालिकेवर सोपविल्याने, ते काम झाल्यानंतरच या पुलाचे काम मार्गी लागणार आहे.
धोकादायक ठरलेला मध्य रेल्वेच्या हद्दीतील हँकॉक पूल अडीच वर्षांपूर्वी पाडण्यात आला. पूल पाडल्यानंतर १८ महिन्यांत नवीन पूल बांधला जाईल, असे आश्वासनही देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष कामाच्या वेळी पुलाच्या खाली असलेल्या रुळाखालून मोठी जलवाहिनी जात असल्याचे लक्षात आल्याने हे काम रखडले.
यावर तोडगा काढण्यासाठी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आपल्या दालनात बैठक बोलाविली होती. या बैठकीत पालिका व रेल्वे अधिकारी उपस्थित होते. पालिकेने ८४ झोपड्यांवर कारवाई केली असून, रेल्वे हद्दीतील ४० झोपड्या या पुलाचे काम सुरू होईल, त्या वेळी पाडण्यात येणार असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.
>झोपड्यांचा अडथळा कायम
पूल पालिका बांधणार असून, रेल्वे हद्दीतील झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी महापालिकेची असेल, असे पत्र मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी पालिकेला दिले आहे. त्यामुळे झोपड्यांचा अडथळा कायम आहे. पालिकेच्या जल विभाग, पूल विभाग व रेल्वेच्या समस्यांचे निवारण होत नाही, तोपर्यंत पुलाचे काम सुरू होणे अशक्य आहे.